During the tour, Ajit Pawar said, I am also a farmer.. the government is making efforts : दौऱ्यात अजित पवार म्हणाले, मी पण शेतकरी.. सरकार प्रयत्नशील
Solapur : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. महामार्ग बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडला असून सोलापूर रेल्वे जंक्शनवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरं पाण्याखाली गेली आहेत तर हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी कोर्टी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
Ravikant Tupkar : माझे फोन टॅप होत आहेत, मी सरकारच्या नजरकैदेत
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “मी पण शेतकरी आहे आणि तुम्हीही शेतकरी आहात. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करेल. आम्हाला पाहणी करू द्या, तुमच्यासारख्या शेतकऱ्यांकडूनच आम्ही खरी परिस्थिती समजून घेत आहोत.” तथापि, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचारले असता अजित पवार त्यांनी भाष्य करणे टाळले.
दरम्यान, कोर्टी येथील काही शेतकऱ्यांनी आमच्या भागात 65 मिलिमीटर पाऊस झाला असा दावा केला. मात्र अजित पवारांनी हा दावा फेटाळला. ते म्हणाले, “हे डोक्यातून काढून टाका. एका दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाला नाही. वरच्या भागातून आलेले पाणी सीना नदीत शिरले आणि नदीच्या दुतर्फा हे पाणी पसरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. रोज थोडा थोडा पाऊस होत होता, पण तो इतक्या प्रमाणात झाला नाही.”
अजित पवार बुधवारी माढा, मोहोळ तालुके तसेच धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांना भेट देणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव आणि परांडा तालुक्यांमध्ये नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रवाना होणार आहेत.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मंत्री सतत भेटी देत आहेत. जिल्हाधिकारी स्वतः कंट्रोल रुममध्ये बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व विभागप्रमुखांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन रात्रंदिवस मदत पोहोचवण्याचे काम करत आहे.
Makrand Patil : १.८० लाख शेतकऱ्यांना मिळणार १२१ काेटींची मदत
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सध्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून, आगामी काही दिवसांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.