All four petitions regarding voter list rejected : मतदार यादीसंदर्भातील चारही याचिका फेटाळल्या
Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा जोरात असतानाच मतदार याद्यांवरील वादांवर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णायक पाऊल उचलले आहे. मतदार यादीतील त्रुटींवर दाखल झालेल्या चारही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या असून, या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची सर्वांनाच प्रतीक्षा असतानाच, मतदार याद्यांतील घोळ आणि बोगस नावे या विषयावर अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्याच अनुषंगाने आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल 42 याचिकांपैकी चार याचिकांवरील सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने त्या फेटाळल्या.
या फेटाळलेल्या याचिकांमध्ये मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यासाठी कमी अवधी मिळाल्याबाबत, ऑनलाइन अर्ज करूनही नाव समाविष्ट न होण्याबाबत तसेच मतदार यादीतील नाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची मागणी या मुद्द्यांवरील दावे होते. मात्र, न्यायालयाने हे सर्व दावे ग्राह्य न धरता संबंधित चारही याचिका फेटाळल्या.
Vote theft case : राज्यातील सर्व मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्राफ्ट यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी दिलेला अवधी पुरेसा होता, त्यामुळे या टप्प्यावर याचिका ग्राह्य धरता येणार नाहीत.” न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती असल्याने काही याचिकाकर्त्यांना आक्षेप नोंदवता आला नाही, हा मुद्दा ग्राह्य धरला जाणार नाही, कारण प्रक्रिया ठरलेल्या कायदेशीर चौकटीतच पार पडली आहे.
या चार याचिका फेटाळल्यानंतर आता उर्वरित 38 याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये मतदार यादीव्यतिरिक्त सीमांकन आणि प्रभाग आरक्षण या मुद्द्यांवरही दावे करण्यात आले आहेत. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातील याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आरक्षण आणि सीमांकनासंदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार असून, त्याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.
याचबरोबर, आजच दुपारी राज्य निवडणूक आयोग आपली पत्रकार परिषद घेणार असून, त्यात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून, त्यात निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा होईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Controversial statement : ‘एक वेळ आई मेली तरी चालेल’… शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य !
हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मतदार याद्यांवरील वादांना तात्पुरता ब्रेक बसला असला, तरी निवडणुकांच्या तोंडावर या घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
____








