Uddhav Thackerays attack on India – Pakistan match : उद्धव ठाकरेंचा भारत-पाक सामन्यावरून हल्लाबोल
Mumbai : भारत-पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. सीमेवर जवान शहीद होत असताना आणि नागरिकांना पाकिस्तानमध्ये हिंदू म्हणून गोळ्या घातल्या जात असताना भाजपाला देशापेक्षा व्यापार मोठा वाटतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकून दहशतवादाविरोधात भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होतं, त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळली जाते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतलं, त्यावेळी मोदींनी जगभरात शिष्टमंडळ पाठवलं. पण आता देशभक्तीची थट्टा न करता, देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. भारत-पाक मॅचला फारसा प्रतिसाद नाही. उद्या जर जय शाह मॅच बघायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणणार का, असा प्रश्नही त्यांनी केला.
मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी जाहीर केलं की शिवसेना भारत-पाकिस्तान सामन्याचा तीव्र निषेध करते. यासाठी राज्यभर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांमार्फत “हर घर से सिंदूर अभियान” राबवण्यात येणार असून, घराघरातून सिंदूर जमा करून तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाणार आहे.
OBC Reservation Fight : ..तर महाराष्ट्रात मनोज जरांगे एकटेच राहणार का ?
उद्धव ठाकरे यांनी मोदींना आवाहन केलं की अजूनही वेळ गेलेली नाही, ही मॅच रद्द करावी. पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवणार नाही, हे मोदींनी दमदारपणे जाहीर करावं. पहलगाम हल्ल्यानंतर ज्यांच्या घरातील महिलांचे सौभाग्य उजाडले, त्या पार्श्वभूमीवर देशभक्तीच्या नावाखाली भाजप दांडिया आयोजित करत आहे, हे लाजिरवाणे आहे अशी टीकाही त्यांनी केली.
____








