Indu Mill Smarak : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारकाचे लोकार्पण पुढच्या वर्षी !

Chief Minister informs that 50 percent of the work is complete : ५० टक्के काम पूर्ण असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

Mumbai: मुंबईतील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामाला गती आली असून संपूर्ण प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करू, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

पुतळा संघर्ष समितीच्या मागणीवरून नव्याने स्थापन केलेल्या समन्वय समितीने प्रकल्पातील महत्त्वाच्या कामाचा आढावा घेतला असून, येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानंतर तांत्रिक अडचणी उद्भवल्या नाहीत, तर पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिनाला स्मारकाचे लोकार्पण शक्य होईल, अशी माहिती स्मारक समितीकडून देण्यात आली आहे. १०० फूट पायथ्यावर ३५० फूट उंचीचा बाबासाहेबांचा कांस्य धातूचे आवरण असलेला भव्य पुतळा उभारला जाणार असून, हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या स्मारकांपैकी एक असणार आहे. पुतळ्याच्या उभारणीत सहा हजार टन पोलाद लागणार असून त्यापैकी १४०० टन पोलाद प्राप्त झाले आहे आणि ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले असून देखाव्यातील लेस आणि शिलाई यांसारखे तपशीलही हुबेहूब ठळक केले गेले आहेत.

Passengers anger : इंडिगो एअरलाईन्सचे प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य

स्मारक परिसरातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे पूर्ण झाली आहेत. अंतर्गत सजावटीचे काम वेगाने सुरू असून बाह्य विकासाची कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे स्मारक पुढील वर्षभरात सर्वांसाठी खुले होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Local Body Elections : मतदान प्रक्रियेत अडथळा, पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की

बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील समाजव्यवस्थेत एकेकाळी निर्माण झालेल्या विषमतेला बाबासाहेबांनी ज्ञानाच्या जोरावर सामोरे गेले, समाज जागृत केला आणि देशाला संविधान दिले. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान न्याय आणि अधिकार देणारे संविधान दिल्यामुळे देश प्रगतीच्या मार्गावर पुढे गेला. वीजमंत्री म्हणून कार्यरत असताना बाबासाहेबांनी राष्ट्रीय ग्रीडची संकल्पना मांडून संपूर्ण देशाला एकत्रित ऊर्जा प्रणाली दिली, जी त्या काळातील प्रगत देशांनाही सुचली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधान श्रेष्ठ आहे आणि भारताचे संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे, ही बाब मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा अधोरेखित केली.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : घरकरातील ५०% सवलतीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

इंदू मिल स्मारकाचे लोकार्पण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून सरकार, समन्वय समिती आणि पुतळा संघर्ष समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बाबासाहेबांना सलामी देणारा हा भव्य प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ जात आहे. जनता आणि चाहत्यांच्या नजरा पुढील वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनावर खिळल्या आहेत, जेव्हा स्मारक अधिकृतपणे राष्ट्राला समर्पित होण्याची शक्यता आहे.

___