Nagpur : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळावा या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. कधी धावपळ, चेंगराचेंगरी होऊन भाविक मृत्यूमुखी पडले. तर कधी शेकडो किलोमीटरचे ट्रॅफीक जाम. यामुळे जाण्यास ईच्छुक असलेले असंख्य लोक जिवाच्या भीतीने प्रयागराजला गेलेच नाहीत. पण वेलीबल ग्रुप आणि सत्संग फाऊंडेशन एक चांगला उपक्रम घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपुरात आज (१६ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा होत असताना हजारो लोक तेथे जाऊ शके नाहीत, याचे शल्य त्यांना बोचत होते. पण वेलीबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनने नागपुरातच रेशीमबाग मैदानावार महाकुंभातील जल आणून महाकुंभाचे पुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे लोकांच्या मनातील ते शल्य दूर झाले. येथे नागपूरसह विदर्भातील लोकांना महाकुंभाचा लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल वेलीबल ग्रुप आणि सत्संग फाऊंडेशनचे कौतुक केले पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पादुकाही रेशीमबाग मैदानावर आणल्या गेलेल्या आहेत. इतक्या भव्य दिव्य प्रमाणात कुंभ पर्व सुरू असताना जाऊ शकत नाही, हे शल्य हजारो लोकांना होतं. त्यांच्यासाठी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीबद्दल पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीतील घटना दुर्दैवी आहे. त्यावर सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अशा पद्धतीच्या घटना होऊ नये, यासाठी निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
लव जिहाद संदर्भात सुप्रीम कोर्टाला लव जिहादची वास्तविकता दिसून आली आहे. एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे गैर काही नाही. पण खोट बोलून लग्न करणे आणि मूल जन्माला घालून सोडून देणे, हे जे काही प्रकार सुरू आहेत, ते अत्यंत वाईट आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.