Amit Shah’s suggestion, message from Chandrakant Patil to Muralidhar Mohol अमित शहांची सूचना, चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळ यांना संदेश
Pune : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या मोक्याच्या जागेच्या विक्री व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं. भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या व्यवहारात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला होता. धंगेकरांनी हे प्रकरण जोरदारपणे लावून धरल्यानंतर, अखेर बिल्डर विशाल गोखले यांनी रविवारी रात्री जैन बोर्डिंग हाऊस ट्रस्टला ई-मेल पाठवून व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं कळवलं. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असे सांगितले जात आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांच्या सूचनेनुसार चंद्रकांत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर परिस्थितीत बदल घडू लागला. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधत “दोन दिवस काही बोलू नका, तोडगा निघेल,” असा शब्द दिला होता. धंगेकरांनी हा शब्द मान्य करत जाहीरपणे सांगितले होते की, दोन दिवस मी गप्प बसेन, मात्र दोन दिवसांत व्यवहार रद्द झाला पाहिजे.
धंगेकरांच्या या निर्धारानंतर अवघ्या काही तासांतच गोखले बिल्डर्सकडून व्यवहार रद्द करण्याचा ई-मेल ट्रस्टला पाठवण्यात आला. विशाल गोखले यांनी या मेलमध्ये नमूद केलं की, “जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर व्यवहारातून माघार घेतो.” त्यांनी 230 कोटी रुपये परत देण्याची विनंतीही ट्रस्टकडे केली असून धर्मदाय आयुक्तालयालाही या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव, धार्मिक भावना आणि नैतिकतेचा तिढा निर्माण झाला होता. जैन समाजाच्या मालकीच्या या जमिनीच्या विक्रीबाबत ट्रस्टच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ट्रस्टींनी व्यवहार मंजूर केला असला तरी, तो होताच समाजातील काही गटांनी विरोध सुरू केला. रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी हा मुद्दा उचलून धरत “ही जमीन विक्री म्हणजे पुण्याच्या श्रद्धास्थानाशी विश्वासघात” असल्याचं म्हटलं.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना सांगितले होते की, “माझा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही.” मात्र, राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, गोखले बिल्डर्स आणि मोहोळ यांच्या नातेसंबंधांमुळे हा व्यवहार गतीमान झाला होता. त्यानंतर धंगेकरांच्या सातत्यपूर्ण दबावामुळे, आणि शिंदे शाह यांच्या समन्वयातून, अखेर हा व्यवहार रद्द करण्यात आला.
धंगेकरांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी शिंदे साहेबांना शब्द दिला होता की, दोन दिवस गप्प बसेन. त्यांनी शब्द दिला की तोडगा निघेल. आज तो शब्द पाळला गेला. आता हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्यावर मी मोहोळ आणि सगळ्यांना जिलेबी भरवणार आहे.”
Political Diwali Milan : किराणा पोहचला अन् भैया-भाभीवर ताई गरम!
या प्रकरणातून स्पष्ट झाले की, पुण्यातील जमीन व्यवहार केवळ मालमत्तेचा प्रश्न नसून राजकारण, नैतिकता आणि जनभावनांचा संगम बनले आहेत. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याने धंगेकरांच्या राजकीय लढ्याला दिलासा मिळाला असला तरी, आता सर्वांचं लक्ष पुढे ट्रस्ट आणि प्रशासन या निर्णयावर काय औपचारिक कार्यवाही करते याकडे लागलं आहे.








