dhananjay-munde-17-lakh-fraud-allegation-manoj-jarange-fadnavis-relative : फडणवीसांच्या पाहुण्यांनाच फटका बसल्याचा मनोज जरांगे यांचा दावा, राजकारणात खळबळ
Mumbai: राज्यातील राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली असून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर येथील रंजना नागपूरकर यांच्या तक्रारीचा दाखला देत मुंडे यांनी १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला. विशेष म्हणजे या प्रकरणाचा संबंध थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नातेवाईकांशी असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, रंजना नागपूरकर यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलीस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल लावून देण्याच्या आश्वासनावरून धनंजय मुंडे यांना १७ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. मात्र, पैसे दिल्यानंतरही अपेक्षित काम झाले नाही. या आर्थिक व्यवहारामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातूनच त्यांच्या पतींचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप रंजना नागपूरकर यांनी केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
High court Nagpur Bench : मलकापूर पालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला उच्च न्यायालयाचा ‘ब्रेक’
या प्रकरणाला अधिक संवेदनशील वळण देताना जरांगे पाटील यांनी दावा केला की, रंजना नागपूरकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी असून त्या फडणवीस कुटुंबाच्या जवळच्या नात्यातील आहेत. “देवेंद्रजी, तुम्हाला कदाचित माहिती नसेल; पण तुमच्याच पाहुण्यांसोबत हा प्रकार घडला आहे. त्या सकाळी माझ्याकडे आल्या होत्या आणि अत्यंत व्यथित अवस्थेत त्यांनी ही आपबिती सांगितली,” असे ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाचा थेट संबंध मुख्यमंत्री कुटुंबाशी जोडला जात असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
रंजना नागपूरकर यांनी केवळ आर्थिक फसवणुकीचाच नव्हे तर धमकीचा देखील आरोप केला आहे. पतीच्या निधनानंतर आपले पैसे परत मागण्यासाठी त्या परळी येथे गेल्या असता धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीतच त्यांना पिस्तूल लावून धमकावण्यात आल्याचा दावा त्यांनी केल्याचे जरांगे पाटील यांनी नमूद केले. पैसे परत न मिळाल्याने आणि जीविताला धोका असल्याची भीती दाखवून हाकलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान सत्ताधारी महायुतीत एकत्र काम करणाऱ्या नेत्यांमध्येच असा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित व्यक्तींनाच फसवणुकीचा सामना करावा लागल्याचा दावा केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आता या सर्व आरोपांवर धनंजय मुंडे कोणते स्पष्टीकरण देतात आणि सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








