Shivsangram will take aggressive stance for farmers demand : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या अध्यक्षांच्या सूचना
Washim “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसंग्रामचा प्रभाव वाढवावा,” अशा शब्दांत शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई मेटे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत वाशिम येथे २६ मे रोजी बुलढाणा, वाशिम व हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. मेटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची रणनीती, ग्रामीण भागातील असंतोषाचे राजकीय भांडवल व शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर केंद्रित मार्गदर्शन केले.
डॉ. मेटे म्हणाल्या, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकार केवळ घोषणांची पुनरावृत्ती करत असून, प्रत्यक्षात मदत पोहोचत नाही. अशा वेळी शिवसंग्रामने शेतकऱ्यांचा खरा आवाज बनले पाहिजे.”
जिल्हानिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला. त्याचबरोबर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर कर्ज वितरण, बी-बियाण्याची उपलब्धता, बोगस बियाण्यांवर नियंत्रण यासंदर्भात प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम पटेल, वाशिम जिल्हाध्यक्ष धनंजय बाजड, हिंगोलीचे परमेश्वर पाटील, बुलढाण्याचे भगवानराव लंबे, तसेच प्रल्हादराव पौळकर, पांडुरंग अंभोरे, दत्ताराव पडोळे, गजानन इडोळे, गजानन बाजत व तिन्ही जिल्ह्यांतील माजी पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.