Chandrabhaga pollution-free, decisions taken for convenience of Warkari : चंद्रभागा प्रदूषणमुक्ती,वारकऱ्यांच्या सोयीसाठी घेतले ऑन द स्पॉट निर्णय
Pandharpur : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा विधीवत पार पडली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी सुरू झालेल्या या पूजेसाठी शिंदे यांच्यासोबत त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांशही उपस्थित होते. या वेळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई वालेगावकर या मानाच्या वारकरी दाम्पत्याने पूजेत सहभाग घेतला. गेले वीस वर्षे अखंड वारी करणाऱ्या या दाम्पत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. उपमुख्यमंत्र्यांनी या मानाच्या वारकऱ्यांना एक वर्षाचा एस.टी. बस पास भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देताना राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या सुखासाठी आणि बळीराजाच्या हक्कासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे ऑन द स्पॉट निर्णय जाहीर केले. शिंदे म्हणाले, “या ठिकाणी व्हीआयपी आम्ही नाही, वारकरीच खरे व्हीआयपी आहेत. मी स्वतः वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा प्रवास पांडुरंगाच्या कृपेमुळेच शक्य झाला.”
Election Commission : मतदार ओळखपत्र देण्यात हलगर्जीपणा, दिवाळीचे कारण
शिंदे यांनी पंढरपूर व परिसरातील विकासासाठी काही ठोस निर्णयांची घोषणा केली. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. तसेच पंढरपूरच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तातडीने पाच कोटी रुपयांचा निधी दिला असून, मंदिर समितीला पर्यटक निवासासाठी ३० वर्षांचा करारवाढीचा निर्णय जाहीर केला.
या महापूजेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही रंगलेले दिसले. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी “आषाढीची महापूजा करण्याची संधी मिळावी” अशी इच्छा व्यक्त केली, तर विठ्ठल एकनाथ शिंदे यांना आगामी निवडणुकीत ताकद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांना यावर्षी महापूजेचा मान देण्यात आला. या निर्णयावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त करत मंदिर समितीला अशा निर्णयांबाबत विचारपूर्वक भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला.
यंदा कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात सुमारे सात लाख भाविक दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच चंद्रभागा नदीकाठी स्नानासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली. वारीच्या उत्साहात पंढरपूर नगरी पुन्हा ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषाने दुमदुमली.
एकनाथ शिंदेंनी या पूजेचा मान चौथ्यांदा मिळाल्याबद्दल विठ्ठल चरणी कृतज्ञता व्यक्त करत, “शेतकरी सुखी झाला, तर महाराष्ट्र नक्कीच प्रगत होईल,” असे सांगत या कार्तिकी एकादशीला धार्मिकतेसोबत राजकीय संदेशही दिला.








