KDMC Election 2026 : डोंबिवलीत मनसेच्या बड्या नेत्याने धरलं कमळ; आता ‘मोठा मित्र’ही पक्षप्रवेशाच्या तयारीत?

Senior MNS leader in Dombivli joins BJP : मनोज घरत यांच्या भाजप प्रवेशाने मनसेला खिंडार; रवींद्र चव्हाणांच्या ‘त्या’ विधानाने राजकीय सस्पेन्स वाढला

Dombiwali कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर (१५ जानेवारी) आले असताना, डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज घरत यांनी अखेर अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. डोंबिवलीतील गोपीनाथ मुंडे चौकात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्यापेक्षाही चव्हाण यांनी केलेल्या एका विधानाने शहरात नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मनोज घरत यांनी निवडणुकीच्या ऐन धामधुमीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. या पार्श्वभूमीवर घरत यांचा भाजप प्रवेश हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “मनोज घरत हे माझे जुने मित्र आहेत. त्यांना भाजपच्या विचारधारेशी जोडण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला होता आणि आज तो योग जुळून आला आहे.” मात्र, त्यानंतर चव्हाण यांनी, “मला खात्री आहे की आमचा अजून एक मोठा मित्रही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल, मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे,” असे सूचक विधान केल्याने तो ‘मोठा मित्र’ नक्की कोण? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

BMC Election 2026 : मुंबईच्या रणधुमाळीत ‘मस्त-मस्त’ तडका, रवीना टंडन ठाकरेंसाठी मैदानात!

मनसेला भगदाड आणि आरोपांच्या फैरी
मनोज घरत यांच्या या निर्णयामुळे मनसेच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. घरत यांनी २० वर्षांच्या प्रवासाचा संदर्भ देत जड अंतःकरणाने पक्ष सोडल्याचे सांगितले असले, तरी त्यांच्या माघारीमुळे विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी या माघारीमागे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, घरत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत विकासकामांसाठी आणि महायुतीच्या बळकटीसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. घरत यांच्या जाण्याने मनसेच्या संघटनात्मक बांधणीला डोंबिवलीत मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.

BMC Election : मुंबई महाराष्ट्राचीच; ‘बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर’ वक्तव्यावर नव्या संघर्षाची ठिणगी

डोंबिवलीत सस्पेन्स कायम
रवींद्र चव्हाण यांनी ‘मोठ्या मित्रा’चा सस्पेन्स कायम ठेवल्याने आता मनसे किंवा इतर विरोधी पक्षांतील आणखी कोणता मोठा चेहरा भाजपमध्ये जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १५ जानेवारीच्या मतदानापूर्वीच अशा प्रकारे बड्या नेत्यांचे पक्षांतर होत असल्याने मतदारांच्या मनावर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्यातरी मनोज घरत यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद डोंबिवलीत वाढली असून, आगामी निकालात याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.