Campaign rallies by leaders from Vidarbha for the Kerala Assembly elections : केरळच्या रणांगणात वैदर्भीय तोफा; ९ एप्रिलच्या मतदानासाठी प्रचार
Nagpur केरळ विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या दक्षिण दिग्विजयासाठी भारतीय जनता पक्षाने आपला ‘नागपूर पॅटर्न’ मैदानात उतरवला आहे. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी भाजपने विदर्भातील दिग्गज नेत्यांची फौज केरळमध्ये तैनात केली असून, प्रवीण दटके, अनिल सोले, गिरीश व्यास आणि परिणय फुके यांसारख्या अनुभवी नेत्यांनी डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
केरळमधील १४० पैकी ८१ विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्रातील ८७ नेत्यांची फौज अहोरात्र राबत आहे. यामध्ये नागपूरच्या नेत्यांनी आघाडी घेतली आहे. आमदार प्रवीण दटके तिरुवनंतपुरममधील अतिशय महत्त्वाच्या ‘कझकूटम’ मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आमदार अनिल सोले यांच्याकडे ‘नेयाट्टीनकारा’ मतदारसंघाची जबाबदारी असून, तेथील सूक्ष्म नियोजनावर त्यांचा भर आहे. माजी आमदार गिरीश व्यास भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ‘नेमम’ मतदारसंघात सक्रियपणे रणनीती आखत आहेत.
Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीची चाहूल; ९ जागांसाठी हालचालींना वेग
आमदार परिणय फुके ‘पुनजर’ विधानसभा क्षेत्रात पूर्णवेळ ठाण मांडून बूथ पातळीवरील संघटन मजबूत करत आहेत.केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील आक्रमक चेहरे केरळच्या गल्लीबोळात भाजपचा विचार पोहोचवत आहेत. यामध्ये आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, गडचिरोलीचे मिलींद नरोटे, वरोराचे करण देवतळे, चिखलीच्या श्वेता महल्ले, अकोल्याचे रणजीत पाटील आणि धामणगाव रेल्वेचे प्रताप अडसड यांचा समावेश आहे. हे सर्व नेते स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जनसंपर्क आणि जाहीर सभांचा धडाका लावत आहेत.
डाव्यांच्या बालेकिल्ल्यात विदर्भाचे हे ‘निवडणूक कौशल्य’ किती यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. नागपूरच्या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे केरळमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला असून, प्रचाराची गती कित्येक पटीने वाढली आहे.येत्या ४ मे रोजी लागणाऱ्या निकालात ‘विदर्भीय डावपेच’ केरळची सत्तापालट करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विदर्भातील या नेत्यांनी सध्या तरी केरळमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे.








