Politics over issuance of birth certificates to Bangladeshi citizens: किरीट सोमय्या विरुद्ध सुनील देशमुख; आरोप-प्रत्यारोप सुरू
Amravati अंजनगाव सुर्जी तालुक्यात बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले वाटप केले. असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते व माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सोमय्यांवर “भंपकगिरी बंद करा” असा जोरदार हल्लाबोल केला आहे.
किरीट सोमय्यांनी प्रशासनावर अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप करत पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, जिल्हाधिकारी स्तरावरील चौकशी अहवाल येण्याआधीच दोषारोप करण्यात आल्याचा आक्षेप देशमुख यांनी घेतला. त्यांनी सोमय्यांवर “चमकोगिरीसाठी बेछूट आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी भंपकगिरी करणे” असे टीकास्त्र सोडले आहे. तसेच, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सोमय्यांना लगाम घालावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ११ फेब्रुवारीला रात्री दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. या तक्रारींमध्ये एकूण सात जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर भास्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नजराना बी साहेब खा, सैय्यद करामत अली सै. नूर, शेख नजिर शेख रशीद, रशीद खान अयान खान आणि मालन बी शेख रऊफ (सर्व रा. अंजनगाव सुर्जी) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार रवींद्र काळे यांच्या तक्रारीवरून अब्दुल सलीम अ. सत्तार (७३), किसनराव रामाजी नेमाडे (७४) आणि शेख रऊफ शेख गयासुद्दीन (७०) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी सोमय्यांच्या आरोपांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “हजारो प्रकरणांपैकी केवळ तीन जन्मदाखले सदोष आढळले असून किरीट सोमय्यांची आरडाओरड तथ्यहीन आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेली आहे.” तसेच, “यापूर्वीही सोमय्यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, परंतु त्याच नेत्यांना भाजपने पक्षात घेतले. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता संपली आहे,” असा आरोप देशमुख यांनी केला.
देशमुख यांनी हेही स्पष्ट केले की, “बांगलादेशी रोहिंग्यांचा मोठा गट अमरावतीत असल्याचा चुकीचा संदेश देशभर पसरला आहे. यामुळे जिल्ह्याची बदनामी होऊन भविष्यात उद्योग व व्यवसायावर परिणाम होऊ शकतो,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे किरीट सोमय्या प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने त्यांना “प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खोटे आरोप करणारा” अशी टीका केली आहे.