Bhujbal’s question: ‘Had it been found already : भुजबळांचा सवाल ‘ आधीच शोधून ठेवले होते का?’
Mumbai : मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजातील पात्रांना प्रमाणपत्र वाटप होत असून, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असतानाच, ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र शंका उपस्थित केली आहे.
“आज दिलेली कुणबी प्रमाणपत्र आधीच शोधून ठेवली होती का? ती 2 सप्टेंबरपूर्वीच मिळवली होती का? दिलेली पत्र योग्य आहेत का, हे तपासायलाच हवे,” अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “माझा कुठल्याही समाजाला विरोध नाही. पण जर चुकीची माहिती देऊन प्रमाणपत्र दिले असेल तर त्याला मी ठाम विरोध करेन.”
ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काल सांगितले होते की, “जर चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे वाटली असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. आणि तेच कोर्टातही शासनासाठी फायदेशीर ठरेल.”
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने मराठवाड्यातील मराठा बांधव समाधानी आहेत. परंतु, भुजबळांच्या शंकेमुळे या प्रक्रियेवर राजकीय वादंग उभं राहण्याची चिन्हं आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, जात प्रमाणपत्रासाठी अर्जदाराने थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. त्यानंतर स्थानिक समितीकडून वंशावळ आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. चौकशी अहवालानंतर उपविभागीय अधिकारी अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे.
मराठा-कुणबी आरक्षणावर सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे मराठा समाजाला दिलासा मिळत असला तरी, छगन भुजबळांचा संशय आणि ओबीसी गटाची सावध भूमिका या वादाला आगामी काळात आणखी तीव्र करतील, अशी शक्यता मात्र व्यक्त केली जात आहे.