Sometimes server down, hangs, causing anger in rural areas : कधी सर्वर डाऊन तर कधी हँग ग्रामीण भागात संताप
Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत आता तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून केंद्रांवर येत आहेत; मात्र वेबसाईट वारंवार डाऊन होणे, हँग होणे आणि सर्व्हर बिघाडामुळे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे रांगा लावूनही निराश होऊन महिलांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांनी सांगितले की, ई-केवायसी प्रक्रियेसाठी त्यांना तासन्तास सायबर कॅफेमध्ये वाट पाहावी लागत आहे. नोंदणी पूर्ण न झाल्याने त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. गोरगरीब व गरजू महिलांना अपेक्षित असलेला योजनेचा लाभ फक्त तांत्रिक बिघाडामुळे अडकून पडल्याने त्यांची हतबल अवस्था झाली आहे.
Dussehra melava : उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून पैसे पुरग्रस्तांना द्यावेत !
राज्य सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. कारण, अर्जांच्या पडताळणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी आढळून आले होते. ई-केवायसीमुळे कागदपत्रांची अचूक छाननी होऊन खऱ्या पात्र महिलांनाच लाभ मिळेल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात तांत्रिक अडचणींमुळे खऱ्याखुऱ्या पात्र महिलांनाच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील महिलांनी स्थानिक प्रशासनाकडे तांत्रिक समस्या त्वरित दूर करण्याची मागणी केली आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून वेबसाईट सुरळीत कार्यरत करावी, जेणेकरून गोरगरीब आणि गरजू महिलांना विनाअडथळा सरकारी मदत मिळू शकेल, अशीही मागणी महिलांकडून होत आहे.
महिलांच्या मते, “आम्ही रांगा लावतो, कागदपत्रे देतो, पण प्रक्रिया पूर्णच होत नाही. दिवस वाया जातो, पैसे खर्च होतात आणि शेवटी घरी निराश होऊन जावे लागते. शासनाने आमच्या या त्रासाला तोडगा काढावा,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सरकारकडून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल का, याकडे आता राज्यातील महिला लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.