Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहिण’च्या ई-केवायसीत सर्व्हरचा खोडा!

Server Issues, OTP Delays, Difficulties in E-KYC : मध्यरात्रीपर्यंत जागरण करूनही आधार अपलोड ठप्प

Buldhana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील लाडके दाजी अक्षरशः झोपेचा त्याग करून रात्री जागरण करताना दिसत आहेत. आधार क्रमांक अपलोड करण्यासाठी सरकारी वेबसाइटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

शासनाने दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यानंतर नागरिकांच्या हालहवालांची सुरुवात झाली. दिवसा वेबसाइटवर ताण असल्याने प्रक्रिया होत नाही, त्यामुळे लोक रात्रीच्या शांतवेळी प्रयत्न करत आहेत. मात्र, तेव्हाही सर्व्हर डाऊन असल्याने प्रयत्न फोल जात आहेत.

Government Schemes: गाजावाजा करुन सुरु केलेली आणखी एक योजना वांद्यात!

ई-केवायसीसाठी वेबसाइटवर लॉगिन करून आधार अपलोड केल्यानंतर ओटीपी येत नाही, आला तर प्रक्रिया पुढे सरकत नाही. अनेकांना ‘हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही’ असा संदेश मिळत आहे. अखेरचा प्रयत्न केला तरी “सर्व्हर एरर” असा संदेश येऊन सगळे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत.

महिलांच्या नावाने असलेल्या या योजनेच्या ई-केवायसीसाठी अनेक ठिकाणी पतीराजांना रात्री उठून आधार अपलोड करण्याची जबाबदारी घ्यावी लागत आहे. ‘लाडकी’च्या हट्टापायी दाजींची झोप उडाली आहे, अशीच परिस्थिती जिल्हाभर दिसत आहे.

काही ठिकाणी पत्नी–पती वादात असल्यास किंवा विभक्त राहत असल्यास ई-केवायसी प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरत आहे. ‘दीड हजार रुपयांच्या योजनेसाठी आता घरातल्या वादांवर तात्पुरता विराम द्यावा लागतो’, अशी उपरोधिक चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू होण्यापूर्वी पात्रतेसाठी अनेक तांत्रिक आणि कागदपत्रीय प्रक्रिया पूर्ण करावी लागली. आता ई-केवायसीसाठी पती-पत्नी दोघांचेही आधार कार्ड अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जोडप्यांना ‘लाडकी’ व ‘लाडका जावई’ दोघांनाही रात्री जागरण करून ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी झटावे लागत आहे.

Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या महिला पदाधिकाऱ्याला खोली नाकारली; हॉटेल मॅनेजरवर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल

‘दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होईल का?’ असा प्रश्न महिलांना पडला आहे. सरकारी सर्व्हर वारंवार ठप्प होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. ‘ई-केवायसीसाठी नाही, तर ई-जागरण सुरू आहे,’ अशी उपहासात्मक टिप्पणी नागरिकांतून केली जात आहे.