Wife Beaten for Not Receiving Benefits of scheme : पतीविरुद्ध गुन्हा, नोंदणी करता आली नाही म्हणून वंचित
Amravati ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पत्नीला मिळाला नाही, याचा राग मनात धरून एका मद्यपी पतीने पत्नीस बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्सी येथे घडली. या प्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी आकाश (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा व आकाशचा सुमारे दीड वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. विवाहानंतर तिने नवीन आधारकार्ड काढण्यासाठी व त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र तांत्रिक अडचणींमुळे आधारकार्ड तयार झाले नाही. त्यामुळे तिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी नोंदणी करता आली नाही आणि ती दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मदतीपासून वंचित राहिली.
गावातील इतर महिलांना योजनेचा लाभ मिळत असताना पत्नीला मदत न मिळाल्याने आरोपी पती आकाश वारंवार संताप व्यक्त करत होता. ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पत्नी अमरावतीहून परत आल्यावर त्याने पुन्हा वाद घातला. “तुझ्या चुकीमुळे माझे नुकसान झाले” असे म्हणत त्याने मद्यधुंद अवस्थेत पत्नीला शिवीगाळ केली आणि कमरेच्या बेल्टने तिच्या पाठीवर, पायावर व मांडीवर मारहाण केली.
Vanchit Bahujan Aghadi : ट्रोलर्सना अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
या प्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद गिरडकर करीत आहेत.








