E-KYC of husband or father is mandatory : पती किंवा वडिलांची ई-केवायसी बंधनकारक
Mumbai: राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत आणखी एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे लाखो महिलांची पात्रता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून मोठी मोहीम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडत असल्याचे दिसून आले. परिणामी बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
नव्या नियमांनुसार, लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न तपासण्याबरोबरच तिच्या पतीचे (लग्न झाले असल्यास) किंवा वडिलांचे (लग्न झाले नसल्यास) उत्पन्नाचीही चौकशी केली जाणार आहे. जर कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक व ओटीपीच्या माध्यमातून स्वतःची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्यांचीही ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. तसेच जात प्रवर्गाची नोंद, शासकीय सेवेत कोणी कार्यरत नाही किंवा निवृत्तीवेतन घेत नाही, तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे याची खात्री करावी लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी महिलेला दरमहा मिळणारे 1500 रुपये पुढे सुरू राहतील. अन्यथा तिचा हक्काचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे या नव्या नियमामुळे मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून बाहेर पडावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








