Amedia is ready to cancel the Mundwa land deal, but : १८०० कोटी रुपयांची शासकीय जमीन केवळ ३०० कोटींना घेतल्याचे प्रकरण
Pune : मुंडवा येथील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या शासकीय जमिनीच्या वादग्रस्त खरेदी व्यवहाराला नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अमेडिया एंटरप्राईजेसने जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
नियमानुसार जमीन खरेदी व्यवहार रद्द करताना खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही हजर राहणे बंधनकारक असते. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेली शितल तेजवानी हजर राहणार का, याबाबत प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता लागलेली आहे. सदर जमीन खरेदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीने खरेदी केली होती. १८०० कोटी रुपयांची ही जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली होती. डेटा सेंटर उभारण्याचा बहाणा करून जिल्हा उद्योग केंद्राकडून स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सवलत मिळवण्यात आली होती. त्यातही दुय्यम निबंधकांनी टक्के स्टॅम्प ड्युटी माफ केली होती.
राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा व्यवहार करण्यात आला होता. समोर आलेल्या दस्तावेजातून ते स्पष्ट झालेले आहे. परिणामी या संपूर्ण प्रकरणात मोठा शासकीय महसूल बुडवला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच सोशल मीडियावरून या प्रकरणावर ‘आधी लूट मग कायदेशीर सूट’ अशी टीका करत भाजप आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता.
Congress : काँग्रेसला कमकुवत करण्यात शरद पवारांसह विरोधी पक्षांची भूमिका !
दरम्यान हा व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी गुन्हा दाखल असल्याने प्रशासनाला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ही जमीन सरकारकडे पुन्हा परत जाणार की कायदेशीर गुंतागुंतीत अडकणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————-








