Nana Patoles allegations; Attack on the government too : नाना पटोलेंचा आरोप; सरकारवरही हल्लाबोल
Mumbai: महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या चौकशी समितीवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, जर मुख्यमंत्री खरोखरच पारदर्शक चौकशी करु इच्छित असतील, तर त्यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती गठित करावी.
नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रातील काही अलायन्समधील पक्षांनी काँग्रेसला कमकुवत करण्याचे ठरवले आहे. पार्थ पवारांच्या १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात उद्योगधंद्याच्या नावाखाली स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी नवे धोरण आणले गेले. मुंबई आणि बीकेसी परिसरातील रस्ते विकास महामंडळाची ५०० एकरांहून अधिक जमीन कोणत्या दराने आणि कोणाला दिली गेली, हे जनतेसमोर यायला हवे.”
पटोले यांनी पुढे सरकारवर निशाणा साधत म्हटलं, “नवी मुंबईचं मार्केट यार्ड आयटी पार्कच्या नावाखाली मोदीजींच्या मित्रांना देण्यात आलं. मुख्यमंत्री म्हणतात ही गंभीर बाब आहे, पण चौकशी फक्त कागदावरच चालते. तुम्ही सरकार चालवत आहात, मग चौकशी बसवायची गरजच काय? दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं असेल तर, तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा. अन्यथा ही चौकशी म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा फार्स आहे.”
त्यांनी पुढे इशारा दिला की, “महाराष्ट्र रोज लुटला जात आहे. अशा वेळी शरद पवार साहेब असोत वा इतर विरोधी पक्ष सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा.”
Local Body Elections : सपकाळांनी चिखलीतून दिला ‘सत्ता परत मिळवू’चा नारा !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, “स्थानिक पातळीवर कोणत्या नगरपालिकेत, जिल्हा परिषदेत किंवा महानगरपालिकेत काँग्रेसने कसे लढायचे याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल. काही ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी आघाडीत निवडणुका लढल्या जाऊ शकतात.”
पटोले यांनी अखेर महाराष्ट्रातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सांगितले, “शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आज दिवसाढवळ्या विकला जात आहे. यावर कोणालाही शांत बसता येणार नाही.”
______








