Large scale steel industries are coming up in Nagpur and Gadchiroli : नागपूर आणि गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणात पोलाद उद्योग येत आहेत
Nagpur: असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी)द्वारे ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कॅम्पस ग्राउंड येथे ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२५ : खासदार औद्योगिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भाच्या विकासासाठी किमान ५० हजार कोटींचे सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे.
नागपूर आणि गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणात पोलाद उद्योग येत आहेत. येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी करार होण्याची शक्यता आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
नागपुरात शुक्रवारी (24 जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांसह विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख व्यावसायिकांना आकर्षित केले जाणार आहे.
आपली प्राथमिकता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, दृष्टीने मागासलेला गडचिरोली जिल्हा आहे. आगामी पाच वर्षांत गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा ठरेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. ॲडव्हांटेज विदर्भमध्ये स्टील, संरक्षण, विमान वाहतूक, बांबू, दुग्धव्यवसाय, शिक्षण, आयटी आणि आयटीईएस, लॉजिस्टिक्स, स्टार्टअप्स, फार्मास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, पर्यटन, वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने, स्टार्टअप इकोसिस्टम एंगेजमेंट यांसह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सेमिनार आणि तांत्रिक चर्चा आयोजित केल्या जातील. स्टार्टअप क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
‘ॲडव्हांटेज विदर्भ-२०२५’मध्ये वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आदी विदर्भातील जिल्ह्यातील उद्योग, औद्योगिक संस्था व संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे व विदर्भाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. नागपूरला आपल्याला लॉजिस्टिक कॅपिटल बनवायचे आहे.
अजनी स्थानकाचा विकास रेल्वे करणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देऊ करण्यात आलेला निधी आता वर्धा जिल्ह्यातील सिंधी ड्रायपोर्टसाठी वापरला जाणारा आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. मिहानचे विस्तारीकरण करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.