Local body election : महायुतीत अजित पवारांचा पक्ष एकाकी पडत चालला!

BJP-Shiv Sena exclude NCP from seat-sharing talks : जागावाटपाच्या चर्चेतून भाजप-शिवसेनेने राष्ट्रवादीला डावलले

Mumbai: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात समन्वय दिसत असताना, महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपाच्या चर्चांमधून डावलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.
त्यामुळे महायुतीत अजित पवारांचा पक्ष एकाकी पडत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेशी पारंपरिक संघर्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस अनेक मोठ्या महापालिकांच्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वी ठरलेली ‘मैत्रीपूर्ण लढत’ आता तीव्र राजकीय संघर्षात बदलत असल्याचे चित्र आहे.

भाजपाने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अनेक प्रभावी नेत्यांना आपल्या गोटात खेचल्यामुळे अजित पवार गटात तीव्र नाराजी आहे. जागावाटपाच्या चर्चांना निमंत्रण न दिल्याचा आरोप राष्ट्रवादीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
अजित पवार गटातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’चा प्रचार केला, अगदी आपल्या बालेकिल्ल्यातही; मात्र आता पक्षाला स्वतःचे ‘घड्याळ’ चिन्ह तळागाळात पोहोचवायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना उभारी देण्याची संधी असून, त्यासाठी स्वतंत्र ताकद दाखवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Municipal election : आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा*”

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने महायुतीअंतर्गत केवळ चार जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी एका जागेवर विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ५९ पैकी ४१ जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली. तरीही मित्रपक्षांकडून सुरू असलेली नेत्यांची पळवापळवी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पचनी पडलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप ११७ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहिला, तर शिंदे यांची शिवसेना ५३ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ३७ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, जागावाटपाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू असल्या तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका जाहीर केल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे, तर ‘मैत्रीपूर्ण लढत’ होईल असे सांगितले होते. मात्र आता ही मैत्रीपूर्ण लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवार गटातील स्थानिक पदाधिकारी शरद पवार गटाशी हातमिळवणी करण्याच्या शक्यतेबाबतही चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांशी चर्चा करावी, असे सांगत मतांचे विभाजन टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी महापौरांपासून स्थायी समिती अध्यक्षांपर्यंत अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षातील अस्वस्थता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या जागावाटपाच्या बैठकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलावले गेले नाही, असा आरोप होत आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतही भाजप आणि शिवसेना परस्परांमध्येच जागावाटप करत असून राष्ट्रवादीला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा दावा पक्षातील नेते करीत आहेत.काही ठिकाणी केवळ मुस्लीमबहुल प्रभागांच्या जागा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

BMC Election 2026: राज–उद्धव ठाकरे यांची युती जाहीर होताच भाजप सतर्क

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेल्यास भाजप युती करणार नसल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले असले, तरी सुनील तटकरे यांनी मुंबईबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीला स्थान मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ‘तिसऱ्या चाकासारखी’ वागणूक दिली जात आहे का, हा प्रश्न आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.