Local body election : नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत तणाव, शिंदे गटात धुसफूस

Even after Fadnavis order state president statement created confusion : फडणवीसांच्या आदेशानंतरही प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने संभ्रम

Mumbai : महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत तणाव पुन्हा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यभर ‘ऑपरेशन कमळ’ सुरूच राहील असे जाहीर केल्यानंतर शिंदे गटात नाराजीची लाट निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत अंतर्गत प्रवेश नको, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर केवळ काही तासांतच चव्हाण यांच्या विधानाने राजकीय तापमान वाढले आहे. महायुतीत निवडणूक लढवण्याचा संदेश दिला जात असतानाच, भाजपकडून सुरू असलेल्या इनकमिंगच्या हालचालींमुळे शिंदे गटाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने कल्याण-डोंबिवलीसह अनेक भागात ऑपरेशन कमळ राबवण्यास सुरुवात केली. या हालचालींमुळे शिंदे गटातील असंतोष उफाळून आला आणि शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर फडणवीसांनी महायुतीत परस्पर फोडाफोडीला आळा घालण्याचे निर्देश दिले होते. पण फडणवीसांच्या आदेशानंतर अवघ्या २४ तासांतच रवींद्र चव्हाण यांनी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचा दावा करत ऑपरेशन कमळ सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. भाजपात इनकमिंग ठप्प होणार नसून त्यात शिवसैनिकांची संख्या मोठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Local body election : नगराध्यक्षपद बिनविरोध, राजकारणात तापल !

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातून साडेचार हजारांहून अधिक शिवसैनिक भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. भाजप महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले, मात्र मित्रपक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरुच असल्याने शिंदे गटाचे समीकरण डळमळीत होते आहे. कल्याण-डोंबिवली हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असताना, इथेच भाजपने अलीकडे केलेली फोडाफोड शिवसेनेच्या मनातील अस्वस्थता आणखी वाढवणारी ठरली आहे.

Congress’s slump : मुलमध्ये काँग्रेसची स्वतःच्या घरातच घसरगुंडी; संधीसाधूला तिकीट देताच संतप्त कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर !

भाजपची एकीकडे महायुती मजबूत असल्याची भूमिका, तर दुसरीकडे सुरू असलेले ऑपरेशन कमळ या दोन भिन्न संदेशांमुळे सरकारमधील दोन्ही गटांमधील ताणतणाव शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सोबतींच्या घरातीलच फोडाफोड सुरू राहिल्यास, त्याचा परिणाम महायुतीच्या समन्वयावर आणि स्थानिक पातळीवरील निकालांवर होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

_______