Congress’s lapse in its own home in Mul; Angry workers rebel as soon as ticket is given to a worker from BJP : स्वतःचे निष्ठावान कार्यकर्ते नाहीत का? मुल काँग्रेस उफाळली; नागरिकही म्हणतात, हा पक्ष कार्यकर्त्यांना संधी देत नाही
Mul – Chandrapur : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुल तालुक्यात काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. भाजपचा झेंडा सोडून नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत समर्थ यांना उमेदवारी देताच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि हताशेची लाट उसळली आहे. ज्याने दोन दिवसांपूर्वी भाजप सोडली, त्यालाच तिकीट? मग आम्ही वर्षानुवर्षे लढतोय ते कशासाठी, असे प्रश्न काँग्रेसच्या गोटात खुलेपणे विचारले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे प्रशांत समर्थ हे भाजपमध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे कट्टर समर्थक होते.
मुलमधील अनेक जुने, कष्टकरी, जमीन पातळीवर काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी अधिक आक्रमक झाले आहेत. पक्षात वर्षानुवर्षे निष्ठेने राहिलेले कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले आणि भाजपातून नुकताच आलेल्या संधीसाधूला तिकीट मिळाली, हा आरोप ते सरळसरळ पक्ष नेतृत्वावर करत आहेत.नवीन आलेल्यांना पक्षात मान, पद, तिकीट, मग आमच्या निष्ठेची किंमत काय, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे.
Patil vs Pawar : राणाजगजितसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळेंना थेट पत्र
बाहेरून आलेल्यावर का एवढा भरोसा?
पक्षात नाराजी असतानाच मुल शहरातील नागरिकसुद्धा या निर्णयावर संतप्त आहेत. लोकांमध्ये चर्चा रंगली आहे की, ज्याला भाजपने मोठं केलं तो भाजपाचा झाला नाही. अन् काँग्रेसने त्याला ताबडतोब तिकीट दिलं. यावरून काँग्रेस गोटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. स्वतःच्या माणसांवरचा काँग्रेसचा विश्वास इतका कमी का झाला? काही नागरिकांनी थेट प्रतिक्रिया देताना म्हटले की, पक्ष सोडून आलेल्या नेत्याचा उद्देश फक्त पद मिळवणे असतो. अशा लोकांवर विश्वास ठेवणे म्हणजे काँग्रेसची घोडचूक आहे.
काँग्रेस देते बाहेरच्यांना संधी..
भाजप आपला कार्यकर्ता वाढवते, घडवते, त्याला पदे देते. काँग्रेस मात्र स्वतःच्या कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवते आणि बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देते. यामुळे पक्षाची मूळ ताकद कमी होत चालली आहे आणि हेच पक्षाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरणार आहे, असा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. काँग्रेसने कार्यकर्त्यांची केलेली तुलना स्थानिक नागरिकांनाही आवडलेली नाहीये.
Shock to Hansraj Ahir : हंसराज अहीरांना एकामागून एक धक्के,नेतृत्वावर वाढता असमाधानाचा सूर
निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता..
काँग्रेसच्या या निर्णयामुळे आंतरिक विसंवाद शिगेला पोहोचला आहे. अनेक कार्यकर्ते प्रचारात सक्रिय न होण्याचे संकेत देत आहेत. काहीजण तर बंडखोरीचा विचार करीत असल्याचेही समजते. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या फटक्याचा धोका निर्माण झाला आहे. मुलमध्ये काँग्रेसने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. नगरपरिषद निवडणुकीचे रण रंगत असताना काँग्रेसचे हे गोंधळलेले धोरण पक्षाला किती महागात पडणार, हे निकालात स्पष्ट दिसेल.








