Ex-MLA son open challenge to Ajit Pawar : अजित पवारांना माजी आमदारपुत्राचे खुले आव्हान !
Mumbai: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायत निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सोलापूरच्या राजकारणात चांगलंच तापलं असून उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान देणारा माजी आमदार राजन पाटील यांचा पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरल्याने संपूर्ण राजकीय समीकरण बदलले. पडताळणी दरम्यान त्यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही नसल्याचे आढळल्याने आक्षेप नोंदवण्यात आला आणि चौकशीअंती अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली.
निवडणुकीसाठी केवळ भाजपाच्या १७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते आणि पडताळणीनंतर ते सर्व बिनविरोध घोषित झाले. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या जागेसाठी तीन महिला उमेदवार रिंगणात होत्या. भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष म्हणून सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धा राहिलीच नाही आणि निवडणूक बिनविरोध पार पडली.
Patil vs Pawar : राणाजगजितसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळेंना थेट पत्र
ही निवडणूक अनगरमधील पाटील कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला प्रथमच आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज दाखल करताच येथील अनेक वर्षांपासूनची बिनविरोध परंपरा तुटेल असे वाटत होते. पण राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाल्यानंतर परिस्थिती भाजपाच्या बाजूने झुकली. यानंतर नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
याचदरम्यान कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून जल्लोष करणारे बाळराजे पाटील कॅमेऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.” त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोलापूरच्या राजकीय वर्तुळात त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
अपक्ष उमेदवाराचं मोठं आव्हान नसल्याने आणि पाटील कुटुंबाचं अनगरवरील वर्चस्व कायम असल्यामुळे प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असली तरी राष्ट्रवादीच्या अर्ज बाद झाल्यानंतर निर्माण झालेला राजकीय वातावरण अजूनही तापलेले आहे.
———————–








