Important meeting of the State Election Commission sparks discussions : राज्य निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे चर्चांना उधाण
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घडामोडींचा सिलसिला सुरू असताना जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या क्रमावरून निर्माण झालेली उत्सुकता अधिकच वाढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली असून येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यात जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका जाहीर करण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची संवैधानिक मर्यादा ओलांडली गेल्याने निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत निवडणूक आयोगाला महानगरपालिका निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोगाने सर्व 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला जाणार असून मतदान यादी, आरक्षण, क्षेत्ररचना आणि निवडणूक व्यवस्थापनासंबंधीच्या तपशीलांवर चर्चा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली होती. त्या बैठकीत मांडण्यात आलेल्या अनेक हरकती आणि तक्रारींच्या अनुषंगाने आजची बैठक निर्णायक मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व अडचणींचा विचार करण्यासाठी आयोग विशेष तयारीत असून मुंबईचे आयुक्तदेखील आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा भंग झालेला असताना 29 महानगरपालिका क्षेत्रांपैकी फक्त चंद्रपूर आणि नागपूर महापालिकांतच आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. त्यामुळे इतर 27 महानगरपालिकांच्या निवडणुका तत्काळ घेणे सुलभ असल्याचे निवडणूक आयोगाला वाटत असल्याची माहिती आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या दिशेने होत असलेल्या हालचाली यातून स्पष्ट दिसत आहेत. आयोगाने यासाठी 4 नोव्हेंबर रोजी 29 महापालिकांच्या आयुक्तांना बैठकीसाठी नोटीस बजावली होती आणि आजची बैठक ही निवडणूक कार्यक्रमाच्या संभाव्य घोषणेपूर्वीची निर्णायक टप्पा म्हणून पाहिली जात आहे.
Pune land scam : जमीन घोटाळा प्रकरणात प्रमुख आरोपी शितल तेजवानीला अटक
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदान यादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. फक्त एका दिवसात तब्बल 1958 हरकती व सूचनांची नोंद करण्यात आली असून, 20 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या मतदान यादीवर 3 डिसेंबरपर्यंत 7452 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मतदान यादीवरील हरकती स्वीकारण्याचा शेवटचा दिवस 3 डिसेंबर होता आणि अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेला आता केवळ औपचारिकतेची प्रतीक्षा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्यातील सर्वांत मोठ्या निवडणूक प्रक्रियेकडे राज्याचे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले असून जिल्हा परिषदांची गुंतागुंत वाढलेल्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुका पुढे आणण्याची शक्यता आता जवळपास निश्चित मानली जात आहे.








