Maha Vikas Aghadi with Raj Thackeray meet Election Commission. : राज ठाकरेंसह महाविकास आघाडी निवडणूक आयोगाला भेटणार
Mumbai: राज्यातील मुंबई महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकांबाबत सर्व विरोधी पक्ष नेत्यांचे एकत्र शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता भेट घेणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
Government scheme : सुरू असलेल्या योजना कायम चालतात असं नाही !
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक पक्षांच्या समस्या आहेत. भाजपच्या देखील काही तक्रारी आहेत, त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील इतर पक्षांनाही निमंत्रण दिलं आहे.”
याबाबत संजय राऊत यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाला भेट घेणे ही आता एक औपचारिकता असली तरी लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. 14 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीत सहभागी व्हावे, अशी आमची विनंती आहे. हे राजकारण नसून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे.”
Historic decision : महिला खेळाडूंसाठीस सुरक्षितता, स्वतंत्र चेंजिंग रूम!
या बैठकीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी ही बैठक राज्याच्या राजकीय समीकरणांवर निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.








