Everyones bubble is bursting; Ajit Pawars attack : प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा हल्लाबोल
Solapur : “प्रत्येकाचा एक काळ असतो. दरवेळी दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटलांवर जोरदार निशाणा साधला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडाळा येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. याच कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते अनगर नगरपंचायतीतील लढाऊ नेत्या उज्वला थिटे यांचा सत्कार देखील करण्यात आला.
अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून मागील काही दिवसांत मोठा राजकीय संघर्ष पेटला होता. अनेक वर्षांपासून अनगर नगरपंचायतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या राजन पाटील यांनी भाजपा प्रवेश केला आणि त्यानंतर १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. नगराध्यक्षपदासाठी राजन पाटलांची सून रिंगणात उतरणार असताना अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून अनगरमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा झाली. नाट्यमयरित्या उज्वला थिटे यांचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरवण्यात आला. त्यांनी न्यायालयात धाव घेतली, पण न्यायालयानेही याचिका फेटाळली. तरीही त्यांनी राजन पाटलांविरुद्धचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Local body election : निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन; ‘हमाम में सब नंगे हैं’
या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूरच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या भाषणात राजन पाटलांवर थेट हल्ला चढवला. “उज्वला थिटे यांनी काय हाल सहन केले ते आपण सर्वांनी पाहिलं. ही लोकशाही आहे. संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान आहे. निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. दमदाटी करून सत्ता टिकत नाही. गावात कोणी ‘अरे’ केले तर कारे करणारेही असतात,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. “आमच्या बहिणीचे रक्षण आम्ही नेहमी करत आलो. पुढील निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे आणा. नवीनांना संधी द्या आणि जुन्याचा अनुभव घ्या,” असं आवाहन पवारांनी स्थानिक कार्यकर्त्यांना केलं.
Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीनंतर मविआमध्ये महाभूकंप!
महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडत अजित पवार म्हणाले, “उज्वला ताई, आम्ही कायम महिलांचा सन्मान करणारे आहोत. महिला संधी दिल्यास सोनं करतात. महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे जिथे महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आलं. पवार साहेबांनी सुरुवात केली, आम्ही त्यात भर घातली. ‘लाडकी बहिणी’ योजनेमुळे महिलांना स्वावलंबन मिळालं. चांद्यापासून बांदापर्यंत महिलांसाठी ४५ हजार कोटी रुपये देतोय.”
मोहोळ तालुक्यातील या कार्यक्रमानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनगर प्रश्नावर राजकीय वातावरण पुन्हा तापले असून अजित पवारांच्या थेट इशाऱ्यामुळे राजन पाटील यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनगरमधील संघर्ष आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
___








