Reservation notification announced; Many may have their calculations messed up: जि.प., पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढणार, लवकरच चित्र स्पष्ट होणार
Akola जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आरक्षणाच्या अनुषंगाने अधिसूचना सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर माजी सदस्यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवले. मात्र आरक्षणाचा अंतिम कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
जागा राखीव करताना त्या-त्या जाती-जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या गटांना उतरत्या क्रमाने आरक्षण देण्यात येणार आहे. याआधी शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचना अंतिम केली होती. ती जैसे थेच ठेवण्यात आली. काहींना दिलासा मिळाला, तर काहींची धाकधूक वाढली. प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता आरक्षण प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अधिसूचनेच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाली. यापूर्वीचे रोस्टर रद्द करून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
अधिसूचनेनुसार, या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घेण्यात येणारी सार्वत्रिक निवडणूक ही या नियमानुसार जागांच्या चक्रानुक्रमासाठी पहिली निवडणूक समजली जाईल. या बदलावर अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत.
अधिसूचनेनुसार अंमलबजावणी झाल्यास दोन्ही बाजूच्या माजी सदस्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट रोजी तत्कालीन सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ आणि गजानन वानखेडे यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
नवीन अधिसूचनेनुसार आरक्षित जागांमुळे सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, तसेच विरोधक असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना नवीन मतदारसंघ शोधावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर गणित जुळवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र काहींसाठी हे नियम फायद्याचे ठरणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रभाग रचना अंतिम करून निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हिवरखेड नगर परिषद झाल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी १ मतदारसंघ (सर्कल) कमी झाला आहे. आता तालुकानिहाय मतदारसंघांची संख्या पुढीलप्रमाणे आहे –
Guardian Minister Bhandara : मोठा निर्णय, भंडाऱ्याचा पालकमंत्री बदलला !
तेल्हारा तालुका : ७ सर्कल
अकोट तालुका : ८ सर्कल
मूर्तिजापूर तालुका : ७ सर्कल
अकोला तालुका : १० सर्कल
बाळापूर तालुका : ७ सर्कल
बार्शीटाकळी तालुका : ७ सर्कल
पातूर तालुका : ६ सर्कल
यापैकी कोणते गट अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.