127 applications for the post of Municipal Council President and 1,820 for member posts : अमरावतीत नगराध्यक्षांसाठी १२७ तर सदस्यपदांसाठी तब्बल १८२० अर्ज
Amravati जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि. १७) अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला. १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान नगराध्यक्ष पदासाठी १२७ आणि सदस्यपदांसाठी तब्बल १८२० उमेदवारी अर्ज दाखल झाले. अखेरच्या दिवशी झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षांत नाराजी आणि बंडखोरीचे वातावरण दिसून आले.
अचलपूर नगरपरिषदेत सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून, ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या या ठिकाणी सर्वच पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेवटच्या दिवशी सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याने काही ठिकाणी उमेदवारांना कक्षात प्रवेश देण्यात आला, तर काही ठिकाणी टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
Local Body Elections : आमदारांच्या ‘सौ’, आई, भाऊ, वहिनी निवडणूक रिंगणात
अखेरच्या क्षणीच काही पक्षांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांच्या उमेदवारांची घोषणा केल्याने तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी बंडाचे झेंडे उभारले. काहींनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला, तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज भरत राजकीय समीकरणे तापवली आहेत. मंगळवारी (दि. १८) अर्जांची छाननी होणार आहे. कोणते अर्ज बाद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुट्टीतही जवळपास हजार अर्ज
१) राज्य निवडणूक आयोगाने यंदा रविवारी (दि. १६) सुट्टी असूनही अर्ज दाखल करण्याची परवानगी दिल्याने त्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ४८ आणि सदस्यपदांसाठी ९४९ अशा एकूण ९९७ अर्जांची नोंद झाली. त्यामुळे सोमवारी प्रशासनावरील ताण काहीसा कमी झाला.
२) ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज दाखल करण्याची मुभा असल्याने बहुतेक इच्छुकांनी ऑफलाइन अर्ज सादर करण्यास प्राधान्य दिले. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित कागदपत्रांसह प्रिंट ‘आरओ’कडे जमा करावी लागत असल्यानेही गर्दी वाढली.
बंडखोरांची मनधरणी सुरू; २१ नोव्हेंबरपर्यंत माघार
१) मंगळवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता ‘आरओ’ कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अर्ज बाद झाल्यास उमेदवारांना न्यायालयात दाद मागण्याची संधी असून, यासाठी विशेष न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Local Body Elections : ओबीसी आरक्षणावर आयोगाची अट; उमेदवारीबाबत अनिश्चितता
२) २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडोबांची मनधरणी सुरू झाली असून, २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचाराला वेग येईल. ३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार संपुष्टात येईल.








