86 applications disqualified; even one application for the president’s post rejected : चिखलीत निवडणूक रणधुमाळी, नगराध्यक्ष–नगरसेवक उमेदवारी छाननी रात्री उशिरापर्यंत
Chikhli बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या चिखली नगरपरिषद निवडणुकीत छाननी प्रक्रियेत मोठे उलथापालथीचे चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी झालेल्या छाननीत चिखलीतील ८६ नगरसेवक उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असून अध्यक्षपदासाठी दाखल झालेला एक महत्त्वाचा अर्जही बाद झाला आहे. छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी अखेरच्या दिवशीपर्यंत नगराध्यक्ष : २१२ अर्ज, नगरसेवक : २५४१ अर्ज, असे एकूण २७५३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. चिखलीत नगरसेवकांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ८६ अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर १८४ उमेदवारच रिंगणात उरले आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या अर्जांतही मोठी टूमळी दिसली. कुणाल बोंद्रे यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रे व फॉर्म अपूर्ण राहिल्याने बाद करण्यात आला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रिंगणात आता २२ उमेदवार उरले आहेत. ज्या उमेदवाराने एका पक्षाच्या नावाने दोन वेगवेगळे अर्ज भरले परंतु एबी फॉर्म न जोडल्याने दोन्ही अर्ज सरळ अपात्र ठरले, हा देखील छाननीतील ठळक मुद्दा ठरला.
चिखली नगरपरिषद निवडणूक केवळ सामान्य निवडणूक नाही, तर दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांसाठी आणि आजी-माजी आमदारांसाठीही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. म्हणूनच अधिकृत उमेदवारांविरोधात उभे राहिलेले ‘बंडखोर’ अपक्ष माघारी घ्यावेत याचे प्रयत्न दोन्ही आघाड्यांकडून जोरात सुरू आहेत.
स्थानिक पातळीवरील मोठमोठ्या नेत्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने अनेकांनी आता “स्वतंत्र गट” / “तिसरी आघाडी” असा पर्याय स्वीकारला आहे. अनेक नाराज इच्छुक अपक्ष म्हणून रिंगणात उभे राहिल्याने स्पर्धा अधिकाधिक चुरशीची झाली आहे. छाननीनंतर जरी मोठी छाटणी झाली असली तरी खरा निर्णय आता उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात होणार आहे.








