ajit pawar meghana bordikar political war of words jintur nagarparishad : बारामतीला दहा लागले तर शंभर दिलेत, मग विकास होणारच की!
jintur : जिंतूर नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार जोरात असून प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्या आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर थेट टीका केली. “जिंतूरचा विकास बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर करू. असा विकास करणे म्हणजे येड्या-गबाळ्याचं काम नाही,” अशा शब्दांत त्यांनी बोर्डीकरांवर निशाणा साधला.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ठणकावून उत्तर दिले. “कायम सत्ता केंद्र हे बारामतीतच राहिलं आहे. अजित दादांनी बारामतीला दहा रुपये लागत असतील तर शंभर रुपये निधी दिलेला आहे. मग बारामतीचा विकास होणारच ना? पण जिंतूर नगरपरिषदेवर त्यांच्याच राष्ट्रवादीची सत्ता असताना इथला विकास का झाला नाही? जर अजित पवारांनी निधी दिला असेल तर तो यांनी घरी ठेवला होता का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे परभणीतील राजकारणात नव्या वादळाला तोंड फुटले आहे.
Local body elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार
दरम्यान, जिंतूरमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये म्हणजेच भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये थेट संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनीही सभेत भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपचे काम म्हणजे नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार करणे आणि तो पैसा निवडणुकीत वापरणे. पण यंदा जिंतूरकर या आमिषाला बळी पडणार नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “भाजपला थांबवण्यासाठीच आम्ही काँग्रेससोबत युती केली,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Ram Mandir flag hoisting : अयोध्येत पुन्हा भगवा फडकला; आजचा दिवस अत्यंत अर्थपूर्ण !
अजित पवार यांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील सभांमध्ये इतर नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला. “मी कामाचा माणूस आहे; आधी करतो मग बोलतो. बाकी अनेकांची शहरं भिकारचोट अवस्थेत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. तसेच नाव न घेता शरद पवार गटावरही ते म्हणाले, “अनेक पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केले. आता आरोप करतात, पण बसवले त्यांनीच. हे वागणं बरं नाही.”
जिंतूर निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून कोणत्या आघाडीचे आरोप बळकट ठरतील आणि कोणती बाजू जनतेला पटवून देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_____








