Local Body Elections : काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून पैशांचा आरोप!

Allegations of money involved in ticket distribution within the Congress : जिल्हा सरचिटणीस राजेश मापारींचा बंडाचा सूर, राजीनाम्याने पक्षात खळबळ

Lonar नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूचाल झाला आहे. तिकीटवाटपात पैशांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करत पक्षांतर्गत अकार्यक्षमता आणि निष्ठावानांना दुय्यम वागणूक दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मापारी यांनी स्पष्ट शब्दांत आरोप केला आहे की, “काँग्रेसने पैसे घेऊन तिकिटे वाटली. निष्ठावानांना दूर ठेवून, पक्षावर टीका करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली.” या आरोपांमुळे ऐन निवडणूक काळात काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या राजीनामापत्रात मापारी म्हणतात— “मी ३२ वर्षे काँग्रेसमध्ये निष्ठेने कार्य केले. १९९५ ला युवक काँग्रेस अध्यक्ष झाल्यापासून सलग १८ वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाचा झेंडा उंच ठेवला.”

Local Body Elections : बुलढाणा पालिकेत चौरंगी लढत! गायकवाड–शिंदे यांची ‘घराणेशाही’ आमनेसामने

“ज्या सर्कलमध्ये काँग्रेसला दोन हजार मते मिळत नव्हती, त्या ठिकाणी विजय मिळवून पक्ष मजबूत केला.” तरीही त्यांच्या कुटुंबाच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीकडे दुर्लक्ष करून स्वतःची उमेदवारी रोखण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला आहे.

मापारी म्हणतात— “माझा मुलगा सात वर्षे युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष; तरीही मला प्रतीक्षा करण्यास सांगितले. माझी नाराजी नाही, पण निष्ठावंतांना का दुर्लक्षित केले जात आहे?” पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांना तिकीट मिळाल्याबाबत त्यांनी रोष व्यक्त केला.

Local Body Elections : महायुतीत भगदाड, मविआही विस्कळीत!

मापारी यांनी अप्रत्यक्षपणे मेहकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या एका शीर्ष नेत्यावरही बोट ठेवले. त्यांच्या म्हणण्यानुसार— “या नेत्याने निष्ठावंतांना बाजूला सारून, पक्षाचे सदस्य नसलेले आणि काँग्रेसला शिवीगाळ करणाऱ्या लोकांना पैसे घेऊन तिकिटे दिली.” या आरोपामुळे स्थानिक काँग्रेसचे समीकरण पूर्णपणे ढवळून निघण्याची दाट शक्यता आहे.