BJP scores major success in Chikhli due to the Chief Minister’s rally : उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा निकाल मात्र ‘कही खुशी, कही गम’
Khamgao निवडणुकीच्या रणधुमाळीत स्टार प्रचारक नेत्यांच्या सभा या उमेदवारांसाठी नेहमीच निर्णायक ठरतात. प्रचारातील वातावरण बदलणे, मतदारांवर प्रभाव टाकणे आणि पक्षाला अनुकूल लाट निर्माण करणे, ही या सभांची प्रमुख भूमिका असते. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर, बुलढाणा जिल्ह्यात प्रचारासाठी झालेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा परिणाम चांगलाच चर्चेत आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा चिखली येथे भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी आयोजित केली होती. या सभेचा सकारात्मक प्रभाव थेट निकालात दिसून आला. चिखली नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासह भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, मुख्यमंत्र्यांची सभा भाजप उमेदवारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सभेने चिखलीत भाजपाचा ‘बोलबाला’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका,ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली !
एकनाथ शिंदे यांच्या सभांचा संमिश्र परिणाम
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभा बुलढाणा व सिंदखेड राजा येथे झाल्या.
बुलढाण्यात शिवसेना (शिंदे गट) ला भरघोस यश मिळाले. नगराध्यक्षपदासह बहुमत मिळवण्यात शिंदे गटाला यश आले.
मात्र सिंदखेड राजा येथे चित्र वेगळे दिसले. येथे शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवाराचा पराभव झाला असून, पक्षाला बहुमताचे संख्याबळही गाठता आले नाही.
Cancer Hospital : दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय चंद्रपूर जिल्ह्याच्या कीर्तीत भर घालणार
अजितदादा पवारांच्या सभाही ‘कही खुशी, कही गम’
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभा चिखली व देऊळगाव राजा येथे पार पडल्या.
देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) ने नगराध्यक्षपदासह बहुमताच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली.
मात्र चिखलीत अजितदादा गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. नगराध्यक्षपदासह अनेक उमेदवारांना समाधानकारक मतेही मिळू शकली नाहीत.
एकंदरीत पाहता, मुख्यमंत्र्यांची सभा भाजपासाठी ‘हिट’ ठरली, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा परिणाम संमिश्र – ‘कही खुशी, कही गम’ असा राहिला. यामुळे स्टार प्रचारक महत्त्वाचे असले तरी, स्थानिक राजकीय समीकरणे, उमेदवारांची ताकद व संघटनात्मक बांधणी हीच अंतिम निकाल ठरविण्यात निर्णायक ठरते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.








