Local Body Elections : प्रभाग रचनेच्या हरकतींवरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने!

BJP-Shinde Sena dispute at the Collector’s Office over objections to ward structure : जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर ११५ हरकती

Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल ११५ हरकती दाखल झाल्याने ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर राजकीय हालचालींना उधाण आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीसाठी इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि आक्षेप नोंदवणारे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर राजकीय गजबजाटाने फुलून गेला होता.

बुलढाण्यात महायुतीत आधीच मतभेद असल्याची चर्चा असताना भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील जुने वैमनस्य आगामी निवडणुकीत पुन्हा तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आमदार गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड स्थानिक राजकारणात सक्रिय होत असल्याने वेगळी राजकीय समीकरणे आकार घेत असल्याची चर्चा रंगत आहे. याशिवाय भाजप जिल्हाध्यक्ष शिंदे यांचे “पालिकेतील गुंडाराज संपवू” हे वक्तव्य चर्चेत असून वातावरण आणखी तापले आहे.

Shashikant Khedkar : घरकुलांच्या प्रश्नावर शिंदे सेनेचा पंचायत समितीवर मोर्चा

लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, खामगाव आणि मेहकर या नगरपालिकांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. या ११ नगरपालिकांमधील सुमारे ६ लाख शहरी मतदारांचे प्रतिनिधित्व ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक व प्रस्थापित नेत्यांची धावपळ वाढली आहे.

बुलढाणा नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेवर गंभीर त्रुटी असल्याचा ठपका ठेवत १५ आक्षेप दाखल झाले आहेत. यावर सुनावणीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रभाग रचना नागरिकांच्या सोयीपेक्षा विशिष्ट व्यक्तींच्या सोयीसाठी करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांनी “सदोष प्रभाग रचना सुधारली नाही तर न्यायालयीन लढाई अपरिहार्य ठरेल” असा इशारा दिला आहे. दलित वस्ती व आदिवासी वस्तींचे विभाजन, नकाशामध्ये प्रगणक न दाखविणे, मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष अशा मुद्द्यांवर शिंदे यांनी नगर प्रशासनावर तोफ डागली.

आझाद हिंद संघटना आणि उद्धव सेनेच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनीही बुलढाण्याच्या प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे या रचनेचा निकाल आणि अंतिम अधिसूचना आता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

PM Kisan Yojna : ‘सन्मान’ मिळाला; पण ‘महासन्मान’ची प्रतीक्षाच!

८ सप्टेंबर रोजी सुधारीत प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे पाठवली जाणार असून त्यानंतर अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नगराध्यक्षांचे आरक्षण आणि मतदार याद्यांची घोषणा याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.