Local Body Elections : लोणारमध्ये भाजपचे ‘एकला चलो रे’, कार्यकर्त्यांमध्ये आनंद

BJP to Contest Independently in Lonar : नगरपालिका निवडणुकीत युतीऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय

Lonar आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात भाजपने युतीला नकार देत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २ नोव्हेंबर रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या बैठकीत निवडणूक प्रमुख मोहन शर्मा, जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष विजय मापारी, जिल्हा सचिव शिवाजी सानप, तालुकाध्यक्ष गजानन मापारी, शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Local Body Elections : महाविकास आघाडीची ‘एकजूट’ तर महायुतीत गोंधळाचे ‘सूटबूट’!

विजयराज शिंदे म्हणाले, “लोणार शहरात १९६० पासून भाजपचे निष्ठावान पदाधिकारी आणि मतदार आहेत. कार्यकर्त्यांनी आता स्वतःची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. प्रत्येक प्रभागातून उमेदवार रिंगणात उतरून लोणार नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवावा.”

त्यांनी पुढे म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना स्वतःची क्षमता आजमावण्याची संधी देतात. संघटनाचे आरोग्य आणि पक्षाच्या वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

मागील अनेक निवडणुका भाजपने युतीत राहून लढवल्या होत्या. मात्र यावेळी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि स्थानिक राजकीय समीकरण लक्षात घेता, २०२५ ची नगरपालिका निवडणूक ‘स्वबळावर’ लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या घोषणेचे कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’चा लाभ मिळाला नाही म्हणून पत्नीला मारहाण!

या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी ६ आणि नगरसेवकपदासाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सर्व उमेदवारांच्या मुलाखती निवडणूक प्रमुखांनी घेतल्या असून, प्रत्येक प्रभागातील उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार लवकरच भाजपकडून अधिकृतरित्या जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष गजानन मापारी आणि शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांनी दिली.