Congress, despite numbers, left dependent on NCP Ajit Pawar : महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी ‘एकमेव’ नगरसेविका मिनल गावंडेंची निवड
Chikhali भाजपचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पालिकेची सूत्रे हाती घेत असतानाच चिखलीच्या नगरराजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या एकमेव नगरसेविका प्रा. मिनल गावंडे यांनी थेट महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करत राजकीय ‘यू-टर्न’ घेतला असून, मविआच्या गटनेतेपदी त्यांची निवड झाल्याने पालिकेतील राजकीय गणिते बदलली आहेत.
विशेष म्हणजे, पालिकेत काँग्रेसचे तब्बल १२ नगरसेवक निवडून आलेले असतानाही गटनेतेपद काँग्रेसकडे न जाता राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या एकमेव नगरसेविकेकडे गेले आहे. त्यामुळे संख्याबळ असूनही काँग्रेसने नेतृत्वाची संधी गमावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चिखली नगरपालिकेत भाजपाचे १३, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट प्रत्येकी एक नगरसेवक आहे. २८ सदस्यांच्या पालिकेत शिंदेसेनेच्या नगरसेविका वैशाली खेडेकर यांनी यापूर्वीच भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. गावंडे या महायुतीसोबत राहतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी अचानकपणे मविआकडे झुकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
१२ नगरसेवक असूनही काँग्रेसने गटनेतेपद दुसऱ्यालाच दिल्याने पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटत आहेत. ‘संख्येने मोठा पक्ष असूनही नेतृत्व दुसऱ्याच्या हाती देणे’ हा निर्णय काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे. परिणामी, एकमेव नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या दावणीला काँग्रेस बांधली गेली, अशी चर्चा रंगू लागली आहे.
महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे गटनेते निवडीवेळी गैरहजर राहिल्याने राजकीय संशय अधिकच बळावला आहे. विरोधी गटातील नगरसेविकेला गटनेतेपद मिळत असताना मविआतीलच घटक पक्षाचा नगरसेवक अनुपस्थित राहणे, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Mahayuti Government : रेशनवर ज्वारी बंद, आता गव्हाचा कोटा वाढवला!
या संपूर्ण घडामोडीमागे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या स्वीकृत सदस्यपदाची रणनीती असल्याची चर्चा आहे. त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूकही लढवली असून, या राजकीय खेळीमुळे त्यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, चिखली नगरपालिकेतील ही घडामोड महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय, काँग्रेसची रणनीती आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची आक्रमक राजकीय चाल यामुळे राज्यस्तरीय चर्चेचा विषय ठरत आहे.








