Congress leaders meet Prakash Ambedkar : काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
Akola महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या यशाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले असून, विजय घडवून आणणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्लीहून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी व्यंकटेश तसेच काँग्रेस मुंबई कमिटीतील काही पदाधिकाऱ्यांनी दादर, मुंबई येथील राजगृह निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा नेते सुजात आंबेडकर तसेच पक्षाचे रणनितीकार सुमित आनंद उपस्थित होते.
Local Body Elections : एकही आमदार नव्हता तेव्हा सात नगराध्यक्ष होते, आता…
या भेटीदरम्यान आंबेडकर आणि काँग्रेस सेक्रेटरी व्यंकटेश यांच्यात चर्चा झाली. बैठकीत काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राष्ट्रीय पातळीवरील काही प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र, या प्रस्तावांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, योग्य वेळी यासंदर्भात बाळासाहेब आंबेडकर माहिती देतील, असे सांगण्यात आले.
याबाबत प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, “आज समाधान आणि आनंद यासाठी आहे की या निमित्ताने काँग्रेस पक्षाला हे भान आले आहे की भाजपाच्या विरोधात ते एकटे लढू शकत नाहीत. भाजप व आरएसएसला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणतेही राजकारण शक्य नाही.”








