Factionalism in Congress will be fatal ahead of elections : विरोधक नाही, स्वार्थी गटबाजीच काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार; एक दिलाने लढले तर दूर नाही सत्ता
Nagpur : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजीचा राक्षस डोकं वर काढतोय आणि तेही अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर. कार्यकर्त्यांमध्ये असलेली चीड, वरिष्ठ नेत्यांमधील सत्ता स्पर्धा यांमुळे संघटन कमकुवत होत चाललं आहे. काँग्रेसच्या नेते स्वतःच्या खुर्चीसाठी झगडत असताना पक्षाच्या जनाधारचे नुकसान होतंय, हे कुणाच्या लक्षात अद्याप आलेलं दिसत नाहीये.
काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा असं दिसून आलं आहे की, काँग्रेसला कोणी विरोधक हरवत नाही, तर काँग्रेस स्वतः स्वतःचा पराभव करते. पक्षात इतकी ताकद आहे की, योग्य संघटन समन्वय आणि नेतृत्व मिळालं तर नागपूर जिल्हाच काय संपूर्ण विदर्भात सत्ता मिळवणं अवघड नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की, एकमेकांना हरवण्यातच काँग्रेस नेते समाधानी दिसत आहेत.
Local Body Elections : नागपूर जिल्हा काँग्रेसच्या ‘त्या’ बैठकीवरून गोंधळात गोंधळ !
नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली बैठक, त्यावरून निर्माण झालेला गोंधळ आणि प्रदेश पातळीवरून केलेला गोंधळात गोंधळ, पक्ष नेतृत्वाने दिलेले कठोर निर्देश या सगळ्यांमुळे पक्षातील अंतर्गत विसंवाद उघड झाला आहे. जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या गटांमध्ये मतभेद इतके तीव्र झाले आहेत की, स्थानिक निवडणुकीत उमेदवार निवडण्यावरूनही संघर्ष उभा राहू शकतो, असे चित्र आहे.
एक दिलाने काम केलं तर विजय निश्चित..
सध्याच्या परिस्थितीत भाजप, शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोणतेही समीकरण काँग्रेसला हरवू शकणार नाही, अशी स्थिती आहे. पण जर पक्षातील सर्व नेत्यांनी एक दिलानं काम केलं, तर नागपूर शहर आणि जिल्ह्यात अजूनही काँग्रेसचा मजबूत जनादार आहे. पण या जनाधाराला दिशा देणारे नेतेच जर गटातटांत अडकले तर कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यामुळे एकदिलानं काम केलं तर आगामी निवडणुकांमध्ये विजय काँग्रेसपासून दूर नाही.
अहंकारावर मात न केल्यास संघटना कोसळेल..
आज काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान विरोधकांचं नाही, तर ते अंतर्गत कलहाच आहे. अहंकार, वैयक्तिक स्वार्थ आणि जुनी वैर यांचा पगडा जर असाच भारी होत राहिला, तर निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस पुन्हा एकदा स्वतःचाच पराभव घडवून आणेल, हे मात्र निश्चित. काँग्रेसच्या इतिहासात अनेकदा सिद्ध झालं आहे की जेव्हा काँग्रेस एकसंघ असते, तेव्हा विरोधकांचीही एकजूट ढासळते. पण जेव्हा काँग्रेस फुटते तेव्हा विरोधक सत्तेत येतात.
अजूनही वेळ गेलेली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून पक्षप्रथम ही भावना जर अंगीकारली, तर नागपूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहू शकते. पण जर गटबाजीचं नाट्य असंच सुरू राहिलं तर जनतेचा विश्वासही उडेल आणि काँग्रेसचे नाव इतिहासात केवळ भूतपूर्व शक्ती म्हणून राहील.








