Local Body Elections : बुलढाणा पालिकेत चौरंगी लढत! गायकवाड–शिंदे यांची ‘घराणेशाही’ आमनेसामने

Four-cornered contest in the Buldhana Municipal Council : काँग्रेसकडून लक्ष्मी दत्ता काकस रणांगणात, भाजपकडून एका जागेचे रहस्य कायम

Buldhana शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा ‘स्फोट’ होताच बुलढाणा नगरपालिका निवडणूक २०२५ चौरंगी लढतीकडे झुकताना दिसत आहे. युती-आघाडीतील गोंधळ, दुसरीकडे बंडखोरीचे सूर आणि वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र उमेदवार—या सर्वांमुळे बुलढाण्याची निवडणूक रंगतदार आणि हायप्रोफाईल होणार हे निश्चित झाले आहे.

महाविकास आघाडीत वाटाघाटी सुरू असतानाच डॉ. संगीता हिरोळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वेळेत उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस–वंचितमधील जागा समन्वयाचा तिढा सुटलेला नसल्याने या अर्जामुळे काँग्रेससमोर नवीन संकट उभं राहत आहे. २१ नोव्हेंबरनंतर अखेरचं चित्र स्पष्ट होणार आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड (शिवसेना – शिंदे गट) विरुद्ध भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे (भाजप) हा बुलढाण्यातील सर्वात चर्चित सामना असेल.

Local Body Elections : महायुतीत भगदाड, मविआही विस्कळीत!

गेल्या २५–३० वर्षांपासून गायकवाड–शिंदे गटांतील राजकीय वैर पुन्हा एकदा नगराध्यक्ष लढतीत डोके वर काढत आहे. पूजा गायकवाड यांना निवडणुकीचा पूर्वानुभव असला तरी, अर्पिता शिंदे यांची ही पहिलीच ‘हायप्रोफाईल’ उमेदवारी आहे.

मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लक्ष्मी काकस यंदाही काँग्रेसच्या उमेदवार म्हणून हॉर्न वाजवत मैदानात उतरल्या आहेत. यामुळे शहरातील निवडणुकीचे त्रिकोणी–चौरंगी रंग अधिक गडद झाले आहेत.

शहरातील १५ प्रभागांत एकूण ३० नगरसेवक निवडायचे आहेत. मात्र भाजपने २९च उमेदवार दिल्याने मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः प्रभाग १ (ब)—सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा—येथे उमेदवार न देण्यामागे तांत्रिक चूक की राजकीय डाव?

भाजपचे ज्येष्ठ नेते मंदार बाहेकर यांच्या पत्नी सरला बाहेकर यांनीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करून काहीजणांना धक्का दिला. मात्र सुरक्षा कारणास्तव त्यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

Local Body Elections : चिखलीत ३ तासांत राजकीय स्फोट, काँग्रेसमध्ये गोंधळ!

मागील निवडणुकीत भाजप–शिवसेना–काँग्रेस यांच्या मतविभाजनामुळे वंचितला नगराध्यक्षपद मिळाले होते. यंदाही तसाच मतांचा तिढा दिसत असला तरी, महाविकास आघाडीतील समन्वयामुळे चित्र बदलेल, अशी शक्यता आहे. पण वंचितनेच स्वतंत्र अर्ज भरल्यामुळे राजकीय शह-काटशहाला आणखी धार आली आहे.

सध्याचे चित्र (नगराध्यक्षपदासाठी प्रमुख स्पर्धक):
अर्पिता शिंदे – भाजप
पूजा गायकवाड – शिवसेना (शिंदे गट)
लक्ष्मी दत्ता काकस – काँग्रेस
डॉ. संगीता हिरोळे – वंचित बहुजन आघाडी