Fresh candidates fielded in 24 out of 30 seats in Malkapur : मलकापूरमध्ये ३० पैकी २४ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी
Malkapur तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा संदेश दिला आहे. प्रस्थापित राजकारणाला धक्का देत नगरपरिषदेतील ३० जागांपैकी तब्बल २४ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नोव्हेंबर २०१६ नंतर प्रथमच झालेल्या या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडल्या होत्या. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या. दीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवार, भावी नगरसेवक आणि विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला होता.
२ डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी १० तर २८ नगरसेवक पदांसाठी एकूण १२९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांनी अनेक अनुभवी राजकीय नेते व अभ्यासकांनाही आश्चर्याचा धक्का दिला.
Local Body Elections : बहुपक्षीय लढतीत काँग्रेसची सरशी; लोणारमध्ये मतविभाजनाचा डाव फसला!
या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक गटनेते राजेंद्र वाडेकर तसेच अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश नेते प्रमोददादा अवसरमोल यांच्या सुविद्यपत्नी रेखाताई अवसरमोल यांना पराभव स्वीकारावा लागला.
मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी रशिदखान जमादार यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ व माजी पाणीपुरवठा सभापती अनिल गांधी तिसऱ्यांदा, तर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजू पाटील व शहेजाद सलीम खान यांना दुसऱ्यांदा मतदारांनी निवडून दिले.
Local Body Elections : २७ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक
या निवडणुकीत निवडून आलेल्या २४ नव्या नगरसेवकांमध्ये मंगला महादेव डोफे, दुर्गेश राजेंद्र राजापुरे, उर्मिलाताई विजयराव जाधव, हेमंत राजेश रिंढे, मिनाक्षी मोहन पाचपांडे, अ. हबीब अ. सत्तार चव्हाण, सुनिता अरुण अग्रवाल, शमाबानो सैय्यद सलीम, अ. मजीद अ. कदीर कुरेशी, रुकय्या खलीक अहमद, रईसखान रशिदखान जमादार, सायना खानम जमील खान जमादार, असमद अंजुम अब्दुल कहार, शेख इमरान शेख गुलाब, शकीलाबी असमतउल्ला शहा, सायनाबी शेख निजाम, शेख नाजीम शेख करीम, हर्षदा रोहन देशमुख, शबाना परवीन साजिद अहमद खान, किसन नारायण पाटील, जयश्री संतोष बोंबटकार, आयेशा मोहम्मद जाकीर, हेमलता ब्रिजलाल मधवानी व माधुरी सोनाजी खर्चे यांचा समावेश आहे.
एकूणच या निकालातून मतदारांनी जुन्या राजकारणापेक्षा नव्या नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या नव्या चेहऱ्यांकडून मलकापूरच्या विकासासाठी कशी कामगिरी होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.








