Local Body Elections : आमदारांच्या ‘सौ’, आई, भाऊ, वहिनी निवडणूक रिंगणात

Leaders from various parties have given candidature to their own relatives : पश्चिम वऱ्हाडात ‘नेत्यांची घराणेशाही’, विविध पक्षांमध्ये १० नातेवाईकांना उमेदवारी

Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या साधारणपणे कार्यकर्त्यांमधून नवीन नेतृत्व घडवणाऱ्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. मात्र, यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये चित्र काहीसे भिन्न दिसत आहे. या तीन जिल्ह्यांतील २५ नगरपरिषदां व नगरपंचायतींच्या निवडणुकीत आजी-माजी आमदार, पक्षाधिकारी आणि प्रमुख नेत्यांनी स्वतःच्या निकटवर्तीयांना उमेदवारी दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विविध पक्षांकडून अशा तब्बल १० नातेवाइकांना थेट रिंगणात उतरवण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्हा :
बुलढाणा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तसेच बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. खामगावमध्ये कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर या उमेदवार म्हणून मैदानात आहेत.

Local Body Elections : ओबीसी आरक्षणावर आयोगाची अट; उमेदवारीबाबत अनिश्चितता

वाशिम जिल्हा :
कारंजा नगरपरिषदेत भाजप नेते नरेंद्र गोलेच्छा यांची सून निशा शांतिलाल गोलेच्छा (रुणवाल) यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याच ठिकाणी एमआयएम नेते युसूफ पुंजाणी यांच्या आई फरिदाबानू मोहम्मद शफी पुंजाणी आणि सून फिज्झा मोहम्मद बिलाल पुंजाणी या दोघींनाही उमेदवारी देण्यात आली आहे. वाशिम नगराध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी उमेदवार आहेत. मंगरुळपीर येथे आमदार श्याम खोडे यांच्या भावसून रुपाली मनोज खोडे यांना भाजपने नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे.

अकोला जिल्हा :
माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी रजिया बेगम या वंचित बहुजन आघाडी – नगरविकास फ्रंटतर्फे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. अकोटमध्ये माजी नगराध्यक्ष संजय बोडखे यांच्या पत्नी अलका बोडखे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. मूर्तिजापूर येथे भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांचे भाऊ उपेंद्र पिंपळे यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली आहे.

आमदारांचे आप्तस्वकीय रिंगणात

जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींत निवडणूक तापणार आहे. यंदा आमदारद्वयांनी आप्तस्वकीयांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानली असून दर्यापूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपने नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे. नलिनी या अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी आहेत. तर दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे यांनी पुत्र यश लवटे यांना अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी खेचून आणली आहे. तसेच धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोठे-अडसड यांना धामणगाव नगर परिषद नगराध्यपदासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. एकंदरीत आमदारद्वयांनी नातलगानाच उमेदवारी दिल्याने निष्ठावंतामध्ये खदखद दिसून येत असून निवडणूक काळात ही खदखद कोणते वळण घेते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Nitin Gadkari : मेळघाटात मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र, कोठा येथे साडी निर्मिती उद्योग

मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ रिंगणात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपातून नामांकन दाखल केल्याने राजकीयदृष्ट्या ही निवडणूक रंगणार आहे. आल्हाद कलोती यांना उपनगराध्यक्षपद दिले जाईल, अशी भाजप सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.