Local Body Elections : चिखलीत पुन्हा ‘महाले विरुद्ध बोंद्रे’ सामना!

Mahale vs. Bondre Face-off in Chikhli : राजकीय तापमान वाढले; भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ‘लेटर बॉम्ब’

Chikhli चिखलीचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे! गेल्या काही महिन्यांपासून शांततेत असलेले स्थानिक राजकीय वातावरण आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नगरपरिषदेतील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करताच, सध्याच्या आमदार श्वेता महाले यांनी थेट प्रतिहल्ला करत “पुरावे सादर करा, अन्यथा आरोप मागे घ्या!” अशी आव्हानात्मक भूमिका घेतली आहे.

प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीतही विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. मात्र, बोंद्रे आणि महाले यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे हा मुद्दा आता राजकीय संघर्षाचे शस्त्र बनला आहे.
माजी आमदार बोंद्रे यांनी दोन दिवसांपूर्वीच नगरपरिषदेतील स्वच्छतेच्या कंत्राटांपासून स्मारकांच्या सौंदर्यीकरणापर्यंत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, “नगरपालिकेत गैरव्यवहाराचा थैमान आहे,” असे विधान करून शहरात खळबळ माजवली होती.

Anil Bonde : ‘आय लव्ह मोहम्मद’नंतर आता आणखी एक पोस्टर!

बोंद्रेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आ. श्वेता महाले यांनी थेट मुख्याधिकारी बिडगर यांना पत्र देवून “आरोपांच्या अनुषंगाने पुरावे मागवावेत” अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर त्यांनी म्हटले आहे — “शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह स्मारकांचे सौंदर्याकरण सुरू आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित कामांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवणे दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्यांकडून पुरावे मागवून चौकशी करावी आणि गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई करावी.” महाले यांच्या या भूमिकेमुळे ‘लेटर बॉम्ब’ फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राहुल बोंद्रे यांनी नगरपरिषदेतील विविध स्मारक, स्वच्छता आणि कंत्राटी कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. ही बैठक ‘फेसबुक लाईव्ह’ असल्याने त्यांचे विधान थेट जनतेपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. आ. महाले यांच्या पत्रानंतर मुख्याधिकारी बिडगर यांनी तत्काळ पाऊल उचलत बोंद्रेंना पत्र जारी केले आहे.

या पत्रात म्हटले आहे — “आपल्याकडे भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने काही ठोस पुरावे असल्यास, ते कार्यालयास सादर करावेत, जेणेकरून योग्य चौकशी करून आवश्यक कारवाई करता येईल.”

Local Body Elections : अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचा त्याग!

बोंद्रे आणि महाले यांच्यातील राजकीय संघर्ष विल्हेवाटीच्या वैरासारखा जुना असून, चिखलीतील सत्तासमीकरणे नेहमी या दोघांभोवती फिरत आली आहेत. गत विधानसभा निवडणुकीनंतर दोघेही ‘न्युट्रल’ राहतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या वादाने पुन्हा दोघेही आमनेसामने आले आहेत. चिखलीच्या राजकीय रणांगणात त्यामुळे पुन्हा एकदा “महाले विरुद्ध बोंद्रे” अशी थरारक लढत रंगण्याचे संकेत आहेत.