Local Body Elections : नगराध्यक्ष एका पक्षाचा, बहुमत दुसऱ्यालाच

Mayor candidate of the majority party defeated : सात नगरपालिकांमध्ये संघर्ष अटळ; अविश्वास प्रस्तावाची शक्यता

Amravati नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जात असला, तरी उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य तसेच विषय समिती सदस्यांची निवड सभागृहात होते. त्यामुळे नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि सभागृहातील बहुमत दुसऱ्या पक्षाकडे असल्यास, पुढील पाच वर्षे पालिकेत संघर्ष व पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १० नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींचे निकाल रविवारी (दि. २१) जाहीर झाले. त्यापैकी सात ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचा असून सभागृहातील बहुमत मात्र दुसऱ्या पक्षाकडे आहे. या नगरपालिकांमध्ये पुढील पाच वर्षे नगराध्यक्ष आणि सदस्यांमध्ये सतत संघर्ष राहण्याची शक्यता असून राजकीय अस्थिरताही निर्माण होऊ शकते.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीनंतर सहआयुक्त कार्यालयामार्फत सोमवारी विजयी नगराध्यक्ष आणि सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही नावे प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील कलम ९ च्या पोटकलम (१) खंड (ब) नुसार विशेष सभा बोलावली जाईल. या सभेत उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
अधिनियमाच्या कलम ५१ च्या पोटकलम (२) नुसार बोलाविण्यात येणाऱ्या पहिल्या विशेष सभेत निवडून आलेल्या सदस्यांमधून उपाध्यक्षाची निवड होईल. या सभेचे पदसिद्ध अध्यक्ष नगराध्यक्ष असतील. मात्र, नगराध्यक्षांकडे सभागृहात बहुमत नसेल, तर त्यांना मासिक सर्वसाधारण सभेत आणलेले ठराव मंजूर होणे कठीण ठरणार आहे.

Local Body Elections : निकालांनी दिला ‘ट्रेन्ड’ बदलाचा इशारा; काँग्रेसची पकड सैल!

नगराध्यक्षांचे बहुमत असलेल्या पालिका
धामणगाव : नगराध्यक्ष भाजपचा; सभागृहातील सर्व २० सदस्य भाजपचे.
नांदगाव खं. : नगराध्यक्ष उद्धवसेनेचा; सभागृहात महाविकास आघाडीचे बहुमत.
शेंदूरजना घाट : नगराध्यक्ष भाजपचा; ११ सदस्य भाजपचे.
चांदूर बाजार : नगराध्यक्ष प्रहारचा; १३ सदस्य प्रहारचे.
वरूड : नगराध्यक्ष भाजपचा; १८ सदस्य भाजपचे.
चिखलदरा : नगराध्यक्ष काँग्रेसचा; १२ सदस्य काँग्रेसचे.
दर्यापूर : नगराध्यक्ष काँग्रेसचा; १७ सदस्य काँग्रेसचे.
नगराध्यक्षांचे बहुमत नसलेल्या पालिका
चांदूर रेल्वे : नगराध्यक्ष स्थानिक आघाडीचा; ११ सदस्य भाजपचे.
अंजनगाव सुर्जी : नगराध्यक्ष भाजपचा; काँग्रेस व उद्धवसेनेचे बहुमत.
मोर्शी : नगराध्यक्ष शिंदेसेनेचा; मात्र सभागृहात बहुमत नाही.
धारणी : नगराध्यक्ष भाजपचा; काँग्रेसचे ८ सदस्य.
अचलपूर : नगराध्यक्ष भाजपचा; काँग्रेसचे १५ सदस्य.

उपाध्यक्ष व समित्यांवरून संघर्ष अटळ
पालिकेच्या पहिल्या सभेत उपाध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार बोलावण्यात येणाऱ्या सभांमध्ये स्थायी समिती, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण आदी समित्यांचे सभापती व सदस्य निवडले जातील. नगराध्यक्षांकडे बहुमत नसल्यास या समित्यांवर विरोधी पक्षांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षांना विशेष निर्णायक मताधिकार
पालिकेच्या कोणत्याही बैठकीत एखाद्या ठरावावर मतदानावेळी समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा विशेष अधिकार नगराध्यक्षांना आहे. उपाध्यक्ष निवडीतही समसमान मते झाल्यास नगराध्यक्ष निर्णायक मत देऊ शकतात, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.

Local Body Elections : शिंदेसेनेच्या डावपेचात काँग्रेस पराभूत; भाजपही पेचात!

अधिनियमाच्या कलम ५१ नुसार नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी निम्म्याहून अधिक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत. असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करता येतो. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या एक वर्षात नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही, असेही अधिनियमात नमूद आहे.