Mayoral hopeful Vrushali Bondre out from the race : ग्रामीण मतदार यादीमुळे शर्यतीबाहेर, चिखली काँग्रेसमध्ये खळबळ
Chikhali चिखली नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या वृषाली राहुल बोंद्रे यांचा पत्ता अखेर निवडणुकीच्या शर्यतीतून कट झाला आहे. भोगावती ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत त्यांचे नाव आल्याने त्या चिखली शहराच्या मतदारयादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इतर इच्छुकांसाठी आता ‘ओपन फील्ड’ तयार झाले आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धा तापली होती. सुरुवातीपासून वृषालीताई बोंद्रे या सर्वाधिक चर्चेत होत्या आणि पक्षाच्या तिकिटासाठी त्यांनी औपचारिक मागणीही केली होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील अद्ययावत यादीत त्यांचे नाव चिखलीऐवजी भोगावती ग्रामपंचायतीत कायम राहिल्याने त्यांचा दावा आपोआपच बाद झाला. या घडामोडीनंतर काँग्रेसमधील इतर इच्छुकांनी आपल्या लॉबिंगला गती दिली आहे.
Local Body Elections : काँग्रेससमोर अस्तित्वाची लढाई, गाफील राहिल्यास पाणीपत अटळ !
२०१६ मध्येही वृषाली बोंद्रे यांचा दावा शेवटच्या क्षणी हुकला होता. त्यावेळी काँग्रेसमधील ‘घरगुती गटबाजी’ आणि पक्षांतर्गत राजकारण यामुळे राहुल बोंद्रे यांची पत्नी असूनही त्यांना तिकीट मिळू शकले नव्हते. त्यावेळी काँग्रेसने करुणा बोंद्रे यांना उमेदवारी दिली होती, तर नाराज गटाने भाजपकडे झुकत प्रिया कुणाल बोंद्रे यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना विजयी केले होते. आता पुन्हा एकदा चिखलीच्या राजकारणात बोंद्रे परिवारातील हा ‘आतील संघर्ष’ चर्चेत आला आहे.
राहुल बोंद्रे हे दोन वेळा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असूनही, दोनही वेळा पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. २०१६ मध्ये पक्षांतर्गत दबाव, आणि आता मतदारयादीतील तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा ‘राजकीय डाव’ पुन्हा कोलमडला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखालील सध्याच्या काँग्रेस वातावरणात वृषाली यांची दावेदारी जवळपास निश्चित मानली जात होती, परंतु या घडामोडीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
वृषाली यांना अलीकडच्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ग्रामीण मतदार म्हणून मतदान करून घेतल्याचे बोलले जाते. याच निर्णयामुळे आता त्यांना शहरातील निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. चिखली शहराने विधानसभा निवडणुकीत राहुल बोंद्रे यांना मोठा लीड दिला होता, त्यामुळे या वेळेस नगराध्यक्षपद त्यांच्या हातात सहज येईल असा अंदाज होता. मात्र ग्रामीण मतदारयादीत नाव राहिल्याने काँग्रेसमधील बोंद्रे कुटुंबाचा ‘राजकीय तिसरा डाव’ अपूर्ण राहिला आहे. वृषाली बोंद्रे ‘रेसबाहेर’ झाल्यानंतर काँग्रेसच्या नगराध्यक्ष तिकिटासाठी आता तिन्ही नावे पुढे आली आहेत:
प्रा. निलेश गावंडे,
कुणाल बोंद्रे,
दीपक देशमाने – राहुल बोंद्रे यांचे विश्वासू आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते, या तिघांमध्ये तिकिटासाठी तीव्र रस्सीखेच होण्याची शक्यता असून, अंतिम निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे राहील.
Sudhir Mungantiwar : देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा राष्ट्रभावनेची स्फूर्ती जागवणारी ठरेल
चिखली नगराध्यक्षपदाशी बोंद्रे परिवाराचा इतिहास घट्ट जोडलेला आहे. १९७४ मध्ये सिद्धिविनायक बोंद्रे, २००१ मध्ये राहुल सिद्धिविनायक बोंद्रे, आणि २०१६ मध्ये प्रियाताई कुणाल बोंद्रे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. पुन्हा थेट जनतेतून निवडणूक होत असताना वृषाली बोंद्रे यांचा ‘क्रमांक’ लागू शकला असता, मात्र या वेळेस राजकीय समीकरणे आणि मतदार यादीतील बदलामुळे त्यांचा ‘पत्ता कट’ झाला आहे.








