Congress faces a battle for survival in Nagpur district : नगरपरिषदा हातून गेल्या, अंतर्गत कलह सुरूच, नेत्यांची धरसोड वृत्ती आणि संघटन शक्तीचा अभाव पराभवाचे मूळ कारण
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेससाठी निर्णायक ठरणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पक्षाचे पाय कमजोर झाले आहेत. संघटन शक्तीपेक्षा गटबाजी आणि अंतर्गत कुरघोड्यांनी काँग्रेसची अवस्था ‘घरातील शत्रू घरभर जळतो’, अशी झाली आहे. याच निष्क्रियतेचा परिणाम म्हणजे अनेक नगरपरिषदांमधील सत्ता पक्षाच्या हातून निसटली. आताही परिस्थिती सुधारली नाही तर आगामी निवडणुकांत काँग्रेसचे पानिपत निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
गेल्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा परिषद खेचून आणली. परंतु त्यांच्याच मतदारसंघातील खापा, सावनेर आणि कळमेश्वर या नगरपरिषदांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. केवळ मोहपा नगरपरिषद राखण्यात केदारांना यश आले. यावरून केदारांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित झाल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर संघटनेचे जाळे कमकुवत झाल्याने काँग्रेसला नगरपरिषदा गमवाव्या लागल्या, अशी चर्चा कार्यकर्त्यांमधूनच ऐकायला मिळते.
Sudhir Mungantiwar : देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा राष्ट्रभावनेची स्फूर्ती जागवणारी ठरेल
राजेंद्र मुळक यांच्या धरसोड वृत्तीनेही पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळते. रामटेक आणि उमरेड या महत्त्वाच्या नगरपरिषदा त्यांच्या निष्क्रियतेमुळे काँग्रेसच्या हातून निसटल्या. मुळक यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून महाविकास आघाडीला अडचणीत आणले होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आता नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शंका घेणे साहजिकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये.
काटोलमध्ये काँग्रेस कधीच सत्तेत आली नाही. उलट भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आपला प्रभाव नगरपरिषदेवर कायम ठेवला. त्यामुळे काटोलसारख्या काँग्रेसच्या पारंपारिक गडावरदेखील पक्ष निष्प्रभ ठरला आहे. उमरेडमध्ये काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे असल्याने पक्षाला काही प्रमाणात संधी आहे. मात्र दोन्ही नेते आपापल्या पद्धतीने कारभार करत आहेत. परिणामी संघटनेत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. नवख्या जिल्हाध्यक्षांवर सर्व गटांना एकत्र आणण्याची जबाबदारी आहे, पण ही लढाई त्यांच्यासाठी सोपी दिसत नाही.
संघटनेची पुनर्रचना आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पुर्नसंचयीत करणे, ही दोन मोठी आव्हाने काँग्रेससमोर सध्या आहेत. स्थानिक नेते गटबजीच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या हिताचा विचार करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो आहे. भाजपकडून काटेकोर नियोजन आणि मजबूत संघटन उभे राहिलेले असताना काँग्रेस अजूनही अंतर्गत मतभेदांत गटांगळ्या खाताना दिसत आहे.
Local body election : महायुतीत फूट! सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना एकत्र नाही,
राजकीय अभ्यासकांच्या मते जर काँग्रेसने या निवडणुकीत धोरणात्मक पावले उचलली नाहीत आणि एकीचे बळ दाखवले नाही तर नागपूर जिल्हा पक्षासाठी राजकीय स्मशानभूमी ठरू शकतो. नगरपरिषदा आणि नगरपंचायती हे संघटनेचे पाया मानले जातात. येथे पराभव झाला तर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा पाय अधिकच खोलात जाईल. थोडक्यात काय तर नागपूर काँग्रेसने आता तरी वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. नाहीतर आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. एकजुटीचा संदेश, तळागाळातील चळवळ आणि जबाबदारीची जाणीव या तिन्ही गोष्टी तातडीने राबवणे काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आवश्यक झाले आहे.








