Municipal polls show the door to city presidents : पाच प्रभागांत ‘नकार’, शिवसेनेचे दांदळे ठरले सरस
Buldhana बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मतदारांनी अनेक राजकीय नेत्यांना अनपेक्षित धक्के दिले. विविध पक्षांचे शहराध्यक्षपद भूषविणारे नेते स्वतःच्या प्रभागातच अपयशी ठरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वगळता तब्बल पाच पक्षांच्या शहराध्यक्षांना त्यांच्या प्रभागातील मतदारांनी स्पष्ट नकार दिला असून, त्यामुळे शहरस्तरीय नेतृत्वाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या हायव्होल्टेज निवडणुकीत बुलढाणा नगरपरिषदेच्या १५ प्रभागांतील ३० जागांसाठी १२४ उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे, यामध्ये विविध पक्षांचे सात शहराध्यक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते. मात्र निकालात केवळ दोन शहराध्यक्षांना यश मिळाले, तर उर्वरित पाच जणांना पराभवाचा सामना करावा लागला.
Municipal Council Election : अनुकूल वातावरण असूनही भाजप अपयशी
प्रभाग क्रमांक ५ (ब गट) मधून शिवसेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र दांदळे यांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. पालिकेवर प्रशासक राजवट असतानाही कोणतेही पद नसताना त्यांनी प्रभागात सातत्याने जनसंपर्क ठेवत आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे मार्गी लावली. या कामाची पावती देत मतदारांनी त्यांना १७०८ मते दिली. प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल ११२३ मतांची आघाडी घेत दांदळे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ३ (ब गट) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष अनिल वर्मा यांनी ८४२ मते मिळवत विजय संपादन केला. त्यामुळे या दोन शहराध्यक्षांनीच मतदारांचा विश्वास कायम राखल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, उर्वरित शहराध्यक्षांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत मोरे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पत्नी मनिषा मोरे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे करत जोरदार प्रचार केला होता. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत ‘आप’ला मोठा फटका बसला. त्यांच्या उमेदवाराला अवघी १६८ मते मिळाल्याने दारुण पराभव झाला.
प्रभाग क्रमांक ७ (ब गट) मधून काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनाही मतदारांनी नाकारले. त्यांना ११५८ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी सतिष बरडे यांनी १५१० मते घेत विजय मिळविला. प्रभाग क्रमांक ९ (ब गट) मधून शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष नारायण हेलगे यांच्या कन्या रूपाली हेलगे यांना ५१३ मते मिळाली, मात्र देविता योगेश परसे यांनी ११९० मते घेत बाजी मारली.
Sarangwadi Case : एसआयटी चौकशी केवळ दिखावा ठरणार? सारंगवाडी घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ची आखणी सुरू!
तसेच प्रभाग क्रमांक १४ (अ गट) मधून भाजपचे शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांच्या पत्नी सरला बाहेकर यांनाही पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ५७७ मते मिळाली, तर मालती आश्रुबा शेळाळे यांनी १३०० मते घेत विजय मिळविला.
एकूणच या निकालातून बुलढाणा शहरातील मतदारांनी पदांपेक्षा प्रत्यक्ष कामगिरीला प्राधान्य दिल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. शहराध्यक्ष असले तरी प्रभागात विश्वास संपादन करण्यात अपयश आल्यास मतदार थेट नकार देतात, हे या निवडणुकीने ठळकपणे अधोरेखित केले आहे.








