Local Body Elections : चांदूरबाजारात मुस्लीम मतदारांनी जुळवले प्रहारचे गणित

Muslim voters work out Prahar’s winning equation in Chandurbazar : बच्चू कडूंच्या अचूक राजकीय खेळीने सर्वच पक्षांना धोबीपछाड

Amravati स्थानिक नगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी चांदूर बाजारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवकांच्या विजयासह स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. या यशामागे मुस्लीम मतदारांचा निर्णायक कौल महत्त्वाचा ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

परंपरागत राजकीय समीकरणांना छेद देत यावेळी मुस्लीम मतदारांनी प्रहारच्या बाजूने एकसंघ मतदान केल्याने सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलून गेली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार, असा अंदाज असतानाही प्रत्यक्ष निकालांनी भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांना धक्का दिला.

Local Body Elections : जिल्ह्यात ‘अल्पमताचे’ ४ नगराध्यक्ष; कारभारात संघर्षाचे संकेत?

प्रहार जनशक्ती पक्षाने यावेळी निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लढवली. स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा, विकासकामे आणि थेट जनसंपर्क यावर भर देत पक्षाने प्रचारात आघाडी घेतली. तसेच अल्पसंख्याक समाजातील प्रभावी आणि अनुभवी नेते प्रहारमध्ये सक्रिय असल्याने मुस्लीम समाजाचा विश्वास प्रहारच्या पारड्यात गेला.

या संपूर्ण राजकीय खेळीचे केंद्रबिंदू माजी आमदार बच्चू कडू ठरले. त्यांच्या अनुभवसंपन्न रणनीती, अचूक राजकीय वाचन आणि स्थानिक पातळीवरील सूक्ष्म गणितामुळे विरोधी पक्ष गाफील राहिले. कुठे उमेदवार उभे करायचे, कुठे आघाडी करायची आणि कुठे थेट लढत द्यायची, याचे नियोजन त्यांनी अचूकपणे केले. परिणामी, भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांना या यशाचा अंदाजच आला नाही.

विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही मोठी सभा घेण्यात आली नाही. जिल्हा पातळीवरील नेतेही प्रचारात फारसे सक्रिय दिसून आले नाहीत. याचा थेट फटका भाजपला बसल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले. दुसरीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती; मात्र काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात प्रहारने प्रभावी घुसखोरी केली. विशेषतः मुस्लीम मतदारांनी काँग्रेसऐवजी प्रहारला पसंती दिल्याने काँग्रेसच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.

Local Body Elections : २७ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक

तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाची मजबूत संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवरील सातत्यपूर्ण संपर्क हे या विजयामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवकांच्या विजयामुळे प्रहारची राजकीय ताकद अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.