Possibility of a major ‘twist’ in the results : तिहेरी दाव्यांनी राजकीय रणधुमाळी; निकालात मोठ्या ‘ट्विस्ट’ची शक्यता!
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र मतदान संपताच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही प्रमुख पक्षांनी ‘गुलाल आमचाच’ असा ठाम दावा केल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिहेरी लढतीत नेमका बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
मतदानानंतर सामान्यतः निकालाचा अंदाज बांधला जातो; मात्र सिंदखेड राजातील चित्र वेगळेच आहे. प्रत्येक गटातील उमेदवार व कार्यकर्ते विजयाबाबत पूर्णपणे आश्वस्त असून, या तिहेरी दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Election Counting : न.प. निवडणूक मतमोजणीदिनी जिल्ह्यात वाहतूक बदल
शिवसेना : आक्रमक प्रचार, विकासाचा अजेंडा
शिवसेनेचे उमेदवार अतिश तायडे यांच्या प्रचारासाठी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अधोरेखित करण्यात आला. नगरपरिषद ‘विकासासाठी दत्तक’ घेण्याचे आश्वासन देत लाडक्या बहिणींसह सर्व घटकांना भावनिक साद घालण्यात आली. अत्यंत नियोजनबद्ध प्रचार, तळागाळातील मतदारांपर्यंत थेट पोहोच आणि आक्रमक रणनितीमुळे विजयाचा पक्का विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : विकासाचा रोडमॅप, महायुतीची ताकद
अजित पवार गटाकडून श्यामभाऊ मेहेत्रे यांनी विकासाचा ठोस ‘रोडमॅप’ मांडत मतदारांशी थेट संवाद साधला. आमदार मनोज कायंदे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काजी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे व विष्णू मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे काटेकोर नियोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देऊळगावराजा येथील सभेतून दिलेल्या विकासाच्या आश्वासनांमुळे महायुतीला मोठी आघाडी मिळाल्याचा दावा करण्यात येत असून, ‘गुलाल आमचाच’ असल्याचा आत्मविश्वास या गटाने व्यक्त केला आहे.
MSRTC : जिल्हावासियांसाठी गुड न्यूज! एसटीच्या ताफ्यात १२ ईव्ही बसेस
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : तरुण नेतृत्व, व्यापक पाठिंबा
शरद पवार गटाचे उमेदवार सौरभ तायडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अवघ्या २१ व्या वर्षी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरलेले सौरभ तायडे यांनी तरुणाईमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडील विजय तायडे यांच्या तीन दशकांच्या राजकीय अनुभवाची साथ, तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार सिद्धार्थ खरात आणि शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे यांचा सक्रिय प्रचार, यामुळे वातावरण अनुकूल असल्याचा दावा आहे. महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी व मनसेचा पाठिंबा लाभल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकंदरीत, सिंदखेड राजा नगरपालिकेचा निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याचा निर्णय आता मतपेट्यांमध्ये बंद आहे. तिन्ही बाजूंनी केलेले ठाम दावे पाहता, निकालाच्या दिवशी मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.








