Rajiv Gandhi Panchayat Raj Organization demands elections : राजीव गांधी पंचायत राज संघटनेने अकोल्यात सादर केले निवेदन
Akola स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेळेत न झाल्यामुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका तात्काळ जाहीर कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर लगेच या निवडणुका होतील, असं सर्वांना वाटलं होतं. पण न्यायालयात विषय प्रलंबित असल्यामुळे अद्याप निवडणुकीचा पेच सुटलेला नाही. विशेष म्हणजे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात, अशी मागणी लावून धरली आहे.
अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी नमूद करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्या कारणावरून सरकार निवडणुका टाळत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेणे हे सरकारवर बंधनकारक आहे.
Vidarbha Farmers : महाराष्ट्र दिनाला काँग्रेस उतरणार रस्त्यावर?
सरकारकडून या संस्थांवर प्रशासक नेमून सत्तेचे केंद्रीकरण केले जात आहे, अशी टीकाही निवेदनात करण्यात आली. हे केंद्रीकरण लोकशाही व्यवस्थेस अपायकारक ठरत आहे. पंचायत राज व्यवस्थेचा गाभा दुर्बल होत आहे. परिणामी, जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत निर्णय घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या हक्कावर स्टीलचं झाकण!
निवेदन सादर करताना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, राजीव गांधी पंचायत राज संगठनचे अकोला महानगर अध्यक्ष मोहम्मद एजाज, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान, अॅड. सुरेश ढाकोलकर, अतुल अमानकर, अविनाश राठोड, बंटी पटेल, इस्माईल भाई टीव्हीवाले, तश्वर पटेल, बब्बुभाई, पद्माकर वासनिक, भीमराव खंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.