Two leaders out of the race for the post of Municipal Council President : दोन्ही नेत्यांचा राजकीय गेम? मलकापूर–नांदुरा मतदारसंघात खमंग चर्चा
Malkapur नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांतून जोरदार लॉबिंग सुरू आहे. अशात मलकापूर–नांदुरा परिसरात दोन जणांचा “पत्ता कट” झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. माजी नगराध्यक्ष व आंदोलनसम्राट अॅड. हरीश रावळ आणि नांदुरातील शिवसेनेचे शहरप्रमुख लाला इंगळे — हे दोन्ही प्रभावी नेते नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.
नांदुरा नगरपरिषद निवडणुकीत २५ वर्षे नगरसेवक, अनेकदा उपाध्यक्ष आणि प्रचंड जनाधार असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख लाला इंगळे हे नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून सर्वात बलवान नाव मानले जात होते. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजेश एकडे यांच्या विजयात त्यांचा मोठा हातभार होता. माळी समाजाला एकत्र आणत त्यांनी काँग्रेसला खुले समर्थन देत भाजप गटात मोठे राजकीय खिंडार पाडले होते.
Akash Fundkar : नगराध्यक्षपदासाठी फुंडकरांच्या घरातूनच उमेदवारी!
या सर्वानंतरही अचानक त्यांचा पत्ता कट करून ‘आकोट विकास आघाडी’ तर्फे सौ. चांडक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिणामी शिवसेना व माळी समाजात नाराजी वाढली असून “हा राजकीय गेम आहे” अशी चर्चा नांदुराच्या गल्लीबोळात सुरू आहे.
मलकापूरमध्येही राजकीय तणाव वाढत असतानाच अॅड. हरीश रावळ यांच्या पत्नी वंदना रावळ यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी सर्वात मजबूत दावेदार म्हणून चर्चेत होते. ओबीसी खुला प्रवर्ग असल्याने त्यांची पात्रता शाबित होत होती.
मात्र स्थानिक काँग्रेस नेत्यांना अॅड. रावळ यांचे राजकीय वजन सहन न झाल्याने त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांच्या पत्नीची उमेदवारीच बाजूला सारण्यात आली. अॅड. रावळ यांनीही पक्षश्रेष्ठींना मिळालेल्या ‘संकेत’नंतर स्पर्धेतून माघार घेत पक्षासाठी काम करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
Local Body Elections : शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस
मलकापूर–नांदुरा या दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेनेशी निष्ठा ठेवणारे किंवा शिवसेनेतून पुढे आलेले हे दोन नेते एका पाठोपाठ बाजूला झाल्याने हा “योजलेला राजकीय गेम” असल्याची खमंग चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. राजकारणातील अंतर्गत समीकरणे, गटबाजी, आणि समोरासमोर टक्कर टाळण्यासाठी आखलेला ‘डाव’ असल्याचे लोक सांगू लागले आहेत.








